मुंबई : २०१९ मध्ये अजित पवारांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजभवनावर 'पहाटेचा शपथविधी'चा कार्यक्रम केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. याबाबत 'सामना रोखठोक'मधून खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांनी 'त्या' बैठकीत नेमकं काय केलं हे सांगितलं.
“नेहरु सेंटरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी सत्तेसाठीच्या वाटाघाटी सुरु असताना मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली होती. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी खर्गे ठाम होते. यावरुन खर्गे आणि शरद पवार यांच्या शाब्दिक चकमक झाली. पवार त्यावेळी खूपच संतापले होते, त्यामुळे ते बैठकीतून उठले आणि निघून जाऊ लागले. याच बैठकीत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील हे शरद पवार यांनी सुचवले होते. पण खर्गे आणि पवार यांच्या चकमकीने बैठकीचा नूर पालटला होता. यावेळी अजित पवार बराच वेळ खाली मान घालून मोबाईलवर चॅटिंग करत होते. त्यानंतर त्यांचा फोन स्वीच ऑफ झाला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे थेट राजभवनावर शपथविधी सोहळ्यातच दर्शन झाले, असा खुलासा संजय राऊतांनी यावेळी केला आहे.
फडणवीस-अजित पवार यांचा शपथविधी होत असताना संजय राऊतांना एक फोन आला. 'तुमचे सरकार बनत नाही. फडणवीस-अजित पवार शपथ घेत आहेत. अजित पवारांनी एनसीपी फोडली. पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्याचे सुप्रिया सुळे यांनी सोशल माध्यमांवर मान्य केले आहे.' पण संजय राऊतांनी चार वाजेपर्यंतचा वेळ मागितला. अजित पवारांसोबत गेलेले परत येतील आणि त्यानंतर स्वतः अजित पवारही गुदमरून परत फिरतील. अगदी तसेच झाले.
'दिल्लीत पवार आणि माझ्यामध्ये उत्तम संवाद होत होता. रोजच आम्ही भेट होतो भाजपाशी डील करण्याच्या ते मनस्थितीत नव्हते. पण भाजपाकडून ऑफर्स येत असल्याचे सांगत होते. लवकरच पंतप्रधान मोदींची भेट घेऊन भाजपासोबत सरकार स्थापन करणे शक्य नसल्याचे आपण त्यांना सांगणार असल्याचंही त्यांनी मला सांगितलं होतं', याचा खुलासा संजय राऊतांनी केला आहे.