शिवसेनेचा ५२वा वर्धापनदिन; उद्धव ठाकरेंच्या भाषणाबाबत उत्सुकता

...

Updated: Jun 19, 2018, 09:04 AM IST
शिवसेनेचा ५२वा वर्धापनदिन; उद्धव ठाकरेंच्या भाषणाबाबत उत्सुकता title=

मुंबई: शिवसेनेच्या ५२व्या वर्धापनदिनाच्या औचित्यानं आज (मंगळवार, १९ जून) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. २०१९ची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा याआधीच करण्यात आलीय. त्यातच पालघरच्या पोटनिवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमधला दुरावा वाढला. पण अमित शाहांच्या भेटीनंतर शिवसेनेची भूमिका बदलतेय का ? याकडे सर्वांचं लक्ष आहे. सामनामधून आज पुन्हा एकदा स्वबळाची गर्जना करण्यात आली आहे.

शाहांच्या 'मातोश्री'भेटीचा तपशील उलघडणार?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलेल्या 'मातोश्री' वारीच्या पार्श्वभूमीवर आज पार पडत असलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाला वेगळं महत्व प्राप्त झालंय... पक्षाच्या 52 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी शिबिरात उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असेल...

'सामना'तून टीकास्त्र

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या भाषणाबाबत उत्सुकता असतानाच शिवसेना मुखपत्र 'सामना'तून टीका केली आहे. 'पैसा व सत्तेचा विषप्रवाह मुंबईसह महाराष्ट्राचे रूप बदलू पाहत आहे. मुंबई नासवण्याचे कारस्थान रचले आहे. ‘बॉम्बे’चे मुंबई केले याची पोटदुखी असणाऱ्यांनी मुंबईतील अनेक नगरे-उपनगरांची नावे परस्पर बदलण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या पाठीवर धपाटा मारला जाईल. परळ, दादर, गिरगाव, वडाळा व शीव, भायखळा, चिंचपोकळी ही त्याच नावाने ओळखली जातील. ज्यांना या ‘गावां’ची नावे बदलून अप्पर वरळी, न्यू कफ परेड वगैरे करून ‘बाजार’ मांडायचा आहे त्यांनी आधी आपल्या बापांची नावे बदलून यावे', असा सज्जड इशाराच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे.