मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत शपथपत्रात सर्व माहिती दिली आहे. एक महिन्यात म्हणजे १२ डिसेंबरपर्यंत पुरावे न दिल्यास त्यांनी माफी मागावी असे आव्हान शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी दिलंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांना त्यांनी पत्रकार परिषदेत उत्तरं दिली. किरिट सोमैया यांनी सातत्यानं जे विषय काढले आहेत, ते जेवणातील लोणच्यासारखे आहेत. त्यांनी आतापर्यंत जेवढे आरोप केलेत, त्याचे एक पुस्तक होईल. त्यांनी न्यायालयात जरूर जावावे असे निलम गोऱ्हे म्हणाल्या.
किरिटी सोमैया पाणचट आहेत, असं रविंद्र वायकर बोललेत, ते खरंय असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच नारायण राणेंना वैफल्याची लागण झालीय असेही त्या म्हणाल्या.
सरकार महिला प्रश्नी गंभीर आहे. गुंडगिरीला कधीही राजाश्रय दिला नाही. उत्तर भारतातील भाजप नेत्यांची महिलांविषयक वक्तव्ये जरा तपासून बघा असे त्या म्हणाल्या. महिला आयोगावर अध्यक्ष नेमण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही त्या पुढे म्हणाल्या.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होणं हे त्यांच्या वर्मावरचे बोट झाले आहे. त्यामुळं वारंवार आरोप होत आहेत. गाणं म्हणणे, चेहरा बदलणं, अगोदरचा चेहरा नंतरचा चेहरा,विधानं करणं...यात रश्मी ठाकरे कधी पडलेल्या नाहीत असेही त्यांनी सांगितले.