लग्नाला नकार दिल्यानं तरुणीला लोकलसमोर ढकललं

मुंबईतील अतिशय धक्कादायक प्रकार 

Updated: Feb 21, 2021, 10:41 AM IST
लग्नाला नकार दिल्यानं तरुणीला लोकलसमोर ढकललं title=

मुंबई : मुंबईतील खार रेल्वे स्थानकातील धक्कादयक घटना घडली आहे. या घटनेतून धक्कादायक बाब समोर आली आहे. लग्नाला नकार दिल्यानं तरुणीला लोकलसमोर ढकलल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. आरोपी सुमेध जाधवला रेल्वे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. 

लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने २१ वर्षीय तरुणीला धावत्या लोकलसमोर ढकलून दिलं. यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तब्बल १२ टाचे लागले आहेत. खार रेल्वेस्थानकावर ही घटना घडली असून, हा शहारा आणणारा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

महत्वाची बाब म्हणजे तरण-तरूणी एकमेकांना दोन वर्षांपासून ओळखतात. दोघे एकत्र काम करायचे आणि त्यांच्या चांगले मैत्रीचे संबंध होते. मात्र कालांतराने तरूणाला दारूचं व्यसन असल्याचं तरूणीला कळलं. ही गोष्ट कळाल्यानंतर तरुणी त्यांच्यापासून दूर राहू लागली. मात्र, तो तरुणीला त्रास देऊ लागला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध तक्रारही केली होती. मात्र, तरीही त्याचं त्रास देणं सुरूच होतं.

खार रेल्वे स्थानकावर शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. सुमेध जाधव असं आरोपी तरुणाचं नाव असून, तो वडाळा येथील रहिवासी आहे. तर तरुणी खार येथील रहिवासी आहे. शुक्रवारी सायंकाळी सुमेध तिचा पाठलाग करत होता. पाठलाग करतच अंधेरी रेल्वे स्थानकावरून तो लोकलमध्ये चढला. त्यानंतर तरुणीने तिच्या आईला फोन करत मदत मागितली. रेल्वे स्टेशनवर तरुणी आईला भेटली. त्यानंतरही आरोपी तिचा पाठलाग करतच होता. तिथेच त्याने लग्नाचा प्रस्ताव दिला. मात्र, तरुणीने तो फेटाळून लावला.

लग्नाला नकार दिल्यानंतर सुमेधनं स्वतःला संपवण्याची धमकी दिली. रेल्व स्थानकात येणाऱ्या गाडीच्या दिशेनं तो धावत सुटला, पण अचानक थांबला आणि पुन्हा परत आला. त्यानंतर तरुणीला जबरदस्तीने पकडलं आणि लोकलच्या दिशेनं घेऊन गेला. रेल्वे स्थानकातून सुटल्यानंतर त्याने तरूणीला प्लॅटफॉर्म आणि धावत्या रेल्वेच्या मध्ये ढकललं. तरुणीच्या आईने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तरुणीच्या डोक्याला जबर मार बसला. जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला १२ टाके पडले आहेत. पोलिसांनी आरोपीला स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.