मुंबई : श्रमजीवी संघटनेने नुकताच विराट मोर्चा काढून आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. तसेच 50 हजारांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर मुलुंड चेक नाका मैदान येथे ठाण मांडून बसले होते. याची दखल रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि विवेक पंडित यांच्यासह श्रमजीवीच्या शिष्टमंडळाची सुमारे अडीच तास प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेत श्रमजीवीच्या सर्व मागण्या मान्य करत अंमलबजावणीसाठीचा नियोजनबद्ध कालबद्ध असा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
श्रमजीवी संघटनेने ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चा नंतरची सभा संपल्यानंतर रॅली काढत मुलुंड चेक नाका येथे ठाण मांडून बसले होते. मोर्चातील प्रमुख मागणी पैकी जातीच्या दाखल्यासाठी पन्नास वर्षाच्या पुराव्याची अट शिथिल करून पंचनामा आणि प्रतिज्ञापत्राच्या आधारावर जात प्रमाणपत्र दिले जाईल. त्याच धर्तीवर जात पडताळणीची प्रक्रिया सुकर झाली असल्याने हे विराट मोर्चाचे अभूतपूर्व यश म्हणावे लागेल असे विवेक पंडित यावेळी म्हणाले,
वन हक्क आणि इतर मागण्याबाबतही सकारात्मक निर्णय झाले. निर्णयासोबत अंमलबजावणी कार्यक्रम आणि पाठपुराव्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त केल्याने हजारो आदिवासींच्या आंदोलनाचे फलित झाल्याचे समाधान वाटते असे पंडित यांनी सांगितले. हा एकनिष्ठ श्रमजीवींच्या एकजुटीचा विजय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.