मुंबई : महानगर क्षेत्रात काम करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी पनवेल, डोंबिवली, विरार येथून, येत्या सोमवारपासून एसटी बसेस सुरू करण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी याबाबत माहिती दिली.
अनिल परब म्हणाले की, महिला व बालविकास मंत्री ॲड. श्रीमती यशोमती ठाकूर यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील महिलांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार मंत्रालय व इतर शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांना ने-आण करण्यासाठी एसटीने त्यांच्या कार्यालयीन वेळेच्या सोयी नुसार पनवेल-मंत्रालय (८:१५/१७:४५), डोंबिवली-मंत्रालय(८:१५/१७:३५) व विरार-मंत्रालय (७:४५/१७:३५) या मार्गावर सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून बस फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत.
या फेऱ्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून अतिरिक्त फेऱ्या या मार्गावर वाढवण्यात येतील असे देखील एसटी प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.