मुंबई : दाऊद इब्राहिमच्या गुन्हेगारी वर्चस्वाला मोठा हादरा बसला आहे. गेली अनेक वर्षे दाऊदचा उजवा हात म्हणून ओळखल्या जाणऱ्या छोटा शकील आणि दाऊद यांच्यात फूट पडल्याचे वृत्त आहे. दाऊद इब्राहिम हा 1993मध्ये झालेल्या मुंबई बॉम्पस्फोटातील प्रमुख आरोपी असून, मागावर असलेल्या मुंबई पोलिसांना तो गेली अऩेक वर्षे गुंगारा देत आहे.
छोटा शकील आणि दाऊद यांच्यात फूट पडणे ही अंडरवर्ल्डमधील मोठी घटना आहे. गुप्तचर यंत्रणेच्या (IB)हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 'छोटा शकील आणि दाऊद यांचे रस्ते आता वेगवेगळे झाले आहेत. शकीलने साधारण 1980मध्ये मुंबई सोडली. त्यानंतर तो दाऊदसोबत पाकिस्तानात कराची येथील रेडक्लिफ एरियामध्ये राहात होता. नुकताच त्याने आपला ठिकाणा बदलला. सध्या तो कोठे राहतो याबाबत समजू शकले नाही,' असे या वृत्तात म्हटले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दाऊद आणि शकील यांच्या गेले काही दिवस मतभेत निर्माण झाले होते. या मतभेदामुळेच दोघांमध्ये फूट पडल्याची चर्चा आहे. जवळपास 30 वर्षे शकील दाऊदसोबत राहात आहे. दाऊद आणि शकील यांनी मिळून गुन्हेगारी गॅंग चालवली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दाऊदचा छोटा भाऊ अनिस हा दाऊद गॅंगमध्ये हस्तक्षेप करत होता. या हस्तक्षेपावरूनच दोघांमध्ये (दाऊद आणि शकील) चर्चा झाली. या चर्चेतच दोघांमध्ये मतभेद झाले. या मतभेदांनंतर शकील वेगळा झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, दाऊद हा प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त आहे. तसेच, त्याचा एकुलता एक मुलगा पाकिस्तानात मशिदीमध्ये मौलवी झाला आहे. त्यामुळे कौटूंबिक आणि शारीरिक पातळीवर असहाय झालेल्या दाऊदपुढे आपल्या साम्राज्याचा वारस कोण हा सवाल आहे. तर, गेली 3 दशकं दाऊदसोबत असलेला शकीला आता साधारण वयाच्या पन्नाशीत आहे. त्यामुळे शकीलला आपण दाऊदचे पुढचे उत्तराधिकारी ही भावना आहे. दरम्यान, दाऊद गॅंगमधील काही निवडक लोकांनाच या फूटीची कल्पना आहे.
सूत्रांकड़ील माहितीनुरा, गेली काही वर्षे गॅंगमधील लोकांना शकीलच आदेश द्यायचा. खास करून मुंबईतील गँगला. हे लोकही शकीलचा आदेश हा दाऊदचा आदेश म्हणून पालन करायचे. पण, आता आपला बॉस नेमका कोण याबाबत या गॅंगमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.