मुंबई : ST bus strike : एसटीच्या संपासंदर्भात मोठी बातमी. संपावर गेलेले 376 एसटी कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. ( ST Employees strike) एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलल्याने संप अधिक चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी संयुक्त कृती समितीची आज महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे.
संपकरी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळानं कारवाई सुरू केली आहे. राज्यातल्या संपावर गेलेल्या 376 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्यातल्या 45 डेपोमधल्या कर्मचा-यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने जीआर काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नाही, त्यामुळे अखेर एसटी महामंडळानं कारवाई सुरू केली. त्यामुळे संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी आरपारची लढाई करु नये, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. एसटी संयुक्त कृती समिती आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची आज बैठक होणार आहे. आज दुपारी 1.30 वाजता ही बैठक मुंबई सेंट्रल एसटी डेपो इथे होणार आहे. एकीकडे सरकारने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यावर आता आजच्या बैठकीला महत्त्व आहे. आजच्या बैठकीत तरी एसटी संपावर तोडगा निघणार का याची उत्सुकता आहे.
सांगलीतले ST कर्मचारी मुंबई कडे रवाना झालेत. हे सांगलीतले एस टी कर्मचारी आता मुंबईतल्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यासाठी काल रात्री ते सांगलीतून रवाना झाले आहेत. राज्यातल्या 376 एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतरही संप कायम आहे. पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर एसटी आगारातले कर्मचारी कडाक्याच्या थंडीतही आंदोलनस्थळीच मुक्काम ठोकून आहेत.