Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षात आता भाजप आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची एन्ट्री झाली आहे. भाजपकडून राज्यापालांना बहुमत चाचणीसाठी पत्र देण्यात आलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना बहुमत चाचणीचं पत्र दिलं.
देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तब्बल 45 मिनिंट चर्चा झाली. यानंतर देवेंद्र फडवणीस यांनी मीडियाशी बोलताना भेटीची माहिती दिली.
राज्यपालांना आज ईमेलद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून भाजपने पत्र दिलेलं आहे. या पत्रात राज्याची आताची जी परिस्थिती आहे त्याचा उल्लेख केलेला आहे, शिवसेनेचे 39 आमदार बाहेर आहेत, काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आम्हाला रहायचं नाही अशी त्यांची तक्रार आहे. अशा या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांजवळ आणि सरकारजवळ बहुमत राहिलेलं नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
त्यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावं अशा प्रकारची विनंती करणारं पत्र राज्यपालांना दिलं आहे. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालायाचे जे विविध निर्णय आहेत. त्या निर्णयांचाही आम्ही उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्या आधारावर राज्यपाल योग्य निर्णय घेतील आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी योग्य ते निर्देश देतील अशी आम्हाला अशी आम्हाला अपेक्षा आहे, अशा आशयाचं पत्र फडणवीस यांनी राज्यपालांना दिलं आहे.