मुंबई : सरकारी कर्मचारी समोर येताच अनेकांना त्यांच्या नोकरीचा हेवा वाटतो. हेवा वाटण्यामागची कारणं तशी अनेक आहेत. पण, त्यातरलं सर्वात मोठं कारण म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची सातत्यानं होणारी पगारवाढ. यावेळीही पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचा अनेकांनाच हेवा वाटत आहे. कारण, पुन्हा तेच...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी नुकतीच समोर आली आहे. कारण सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात येणारा महागाई भत्ता (Dearness Allowance) तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही मोठी घोषणा केली. मुखयमंत्र्यांच्या घोषणेनंतर महागाई भत्ता आता 31 टक्क्यांवरुन 34 टक्के इतका झाला आहे. ऑगस्ट 2022 पासून ही वाढ लागू होईल. परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव अगदी दणक्यात पार पडेल यात शंका नाही.
11 ऑगस्ट या दिवशीच सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात भत्त्याचे वाढीव पैसे आले आहेत. केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 4 टक्के वाढ केली. यानंतर महाराष्ट्र शासनानं कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन हप्तेही जमा केले. आता तिसरा हप्ताही कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा वेतनवाढीची गोड बातमी मिळाल्यामुळं पुन्हा एकदा कर्मचारी वर्गातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.