एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा नाही

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत एसटीनं प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसत आहे. तर दुसऱ्या बाजूला संपामुळे खासगी वाहनचालकांनी तिकिटाचे दर अव्वाच्या सव्वा केल्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय.

Updated: Oct 18, 2017, 11:34 PM IST
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा नाही title=

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत एसटीनं प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसत आहे. तर दुसऱ्या बाजूला संपामुळे खासगी वाहनचालकांनी तिकिटाचे दर अव्वाच्या सव्वा केल्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय.

प्राप्त माहितीनुसार सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यात बोलणी सुरू आहेत. मात्र, संपाचा तीढा सोडविण्यास अद्याप यश आले नाही. मंगळवारी एसटीच्या सहा हजार आठशे फेऱ्यांपैकी अवघ्या सातशेच फेऱ्या झाल्या होत्या. तर बुधवारी एसटीची अवघी एकच फेरी झाली. भाऊबीज तोंडावर असल्यानं, लाखो प्रवासी दोन दिवसांत प्रवासासाठी येणार असल्यानं, वाहतूक संकट अधिकच तीव्र होणार आहे.
पुण्यातही एसटी स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली आहे. अनेक प्रवाशांनी आपले दिवाळीचे बेत रद्द केलेत. कुर्ला स्थानकातूनही एकही बस सुटली नाही. नाशिक जिल्ह्यात एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, कर्मचारी सातव्या वेगन आयोगाच्या मागणीवर ठाम असल्यामुळे आणि सरकारही मागण्या मान्य करत नसल्यामुळे संप चिघळला आहे. यामुळं मात्र ढिम्म सरकार, ठाम कर्मचारी आणि हैराण प्रवासी असं चित्र राज्यात निर्माण झालंय.

मुंबईत 'बेस्ट'ची सावध पावले

दरम्यान, राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संपाचे हत्यार उपसल्यामुळे संपूर्ण वाहतूक यंत्रणाच कोलमडली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुंबईतील बेस्ट कर्मचारीही संपावर जाण्याच्या विचारात होते. मात्र, महापालिकेने या कर्मचाऱ्यांना साडेपाच हजार बोनस देण्याचा निर्णय घेतला आणि संभाव्य संप टळला. मुंबई महापालिका बेस्टला बोनससाठी २५ कोटी रूपये अँडव्हान्सपोटी देणार आहे. बेस्टच्या ४१ हजार कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार आहे. यामुळे वडाळ्यामध्ये सुरू असलेलं युनियनच्या नेत्यांचं उपोषण आंदोलन आणि शनिवारी होणारा बेस्टचा एकदिवसीय संपही मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षीही साडेपाच हजार रूपये बोनस दिला गेला होता. मात्र, यंदा आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळं बोनसचा प्रश्न रेंगाळला होता.