'भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतं'

भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतंय. भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक आता थांबवावी, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Updated: Oct 18, 2017, 09:04 PM IST
'भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतं' title=

मुंबई : भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतंय. भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक आता थांबवावी, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने दिवाळी सणाचा मुहूर्त साधत शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप केले. या पार्श्वभूमीवर चव्हाण प्रसारमाध्यमांशी कराडमध्ये बोलत होते. या वेळी बोलताना चव्हाण म्हणाले, कॉंग्रेस सरकारच्या काळातही कर्जमाफी झाली. पण, तेव्हा त्या निर्णयाची आम्ही कधीच जाहीरात केली नाही. तसेच, त्यावेळी आम्ही संपूर्ण कर्जमाफी दिली होती, अशी आठवणही चव्हाण यांनी सरकारला करून दिली.

दरम्यान, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय प्रत्यक्षात उतरवला. सह्याद्री आतिथीगृहावर थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटण्यात आली. तर, राज्यातील इतर महत्त्वाची शहरे आणि जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रे वाटण्यात आली. प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ही प्रमाणपत्रे देण्यात आली. राज्याची राजधानी मुंबई येथे शेतकरी कर्ज माफी संबंधी मुख्य कार्यक्रम पार पडला. तर, उपराजधानी नागपुरात देखील येथील शेतकऱ्यांकसाठी कर्जमाफी संबंधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर दिवाळीच्या तोंडावर या कार्यक्रमाचे आयोजन झाल्याने शेतकरी सुखावला असला तरीही राज्य सरकारकडून आपल्या आणखी काही अपेक्षा असल्याची भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. दरम्यान, काही तांत्रिक अड़चणी असल्यामुळे पहिल्या दिवशी केवळ ८ लाख ४० हजार शेतक-यांना प्रत्यक्षात कर्जमाफी देता आली. येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत ७५  टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं काम पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.