मुंबई : राष्ट्रीय बँकांचं विलिनीकरण, वाहनक्षेत्रातील मंदी, जागतिक बाजारांमध्ये असलेला निरुत्साह या सर्वांचा एकत्रित परिणाम आज भारतीय बाजारांवर पाहायला मिळाला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स ७७० अंशांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक २२५ अंशांनी कोसळला. बँकांच्या विलिनीकरणारी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी संध्याकाळी केली होती. त्यानंतर तीन दिवस बाजार बंद होते.
आज बाजारांनी यावर आपली तीव्र नाराजी आकड्यांमधून दाखवून दिली. ८ मुख्य क्षेत्रांमधील वाढ २ पूर्णांक १ टक्क्यापर्यंत खाली आल्यानं बाजारात चिंतेचं वातावरण आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्न ५ टक्क्यांपर्यंत खाली आलंय. अमेरिका-चीन व्यापार युद्धाची छाया जगभरातील बाजारांवर आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम आज भारतीय बाजारांमध्ये पाहायला मिळाला.