मुंबईकरांसाठी आंदोलन थांबवले - नाना पटोले

महाराष्ट्राचा अपमान होईल, लोकांची गैरसोय होईल असे काही करणार नाही. त्यामुळे मुंबईतील आंदोलन थांबवित आहे

Updated: Feb 14, 2022, 12:44 PM IST
मुंबईकरांसाठी आंदोलन थांबवले - नाना पटोले title=

मुंबई : आम्ही तर शांततामय पद्धतीने आंदोलन करणार होतो. पण, भाजपने गुंडगिरी केली. आम्हाला जनतेची काळजी आहे. महाराष्ट्राचा अपमान होईल, लोकांची गैरसोय होईल असे काही करणार नाही. त्यामुळे मुंबईतील आंदोलन थांबवित असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटील यांनी दिलीय.

आम्ही हल्लेखोर नाही. पण, आमचे आंदोलन सुरु असताना भाजपचे गुंड सागर बंगल्याबाहेर पोचले. गुंडगिरीच्या माध्यमातून त्यांनी लोकांना थांबवले. काँग्रेसने शांतता आणि लोकशाही मार्गाने आंदोलन केले. पण, लोकांची जी गैरसोय झाली त्याला जबाबदार भाजपचं आहे. भाजपचा गुंडाचा चेहरा बाहेर आल्याची टीकाही त्यांनी केली.

नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा, मुंबईचा अपमान झाला तरी चालेल. महाराष्ट्र बरबाद झाला तरी चालेल. मुंबईची सगळी संपत्ती विकून गुजरातला नेली तरी चालेल. पण, नरेंद्र मोदींचे समर्थन करू, ही भाजपची वृत्ती आहे.  
 
मोदी यांनी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला तरी चालेल. पण, त्यांच्याविरोधात काहीही ऐकून घेतले जाणार नाही ही भाजपची भूमिका आहे. त्यामुळे ते मोदी यांच्या वक्त्यव्याला समर्थन देत आहेत. यावरून भाजप संस्कृती आज कळली, असा टोला पटोले यांनी लगावला. 

भाजपचा चेहरा लोकांच्या लक्षात आला आहे. त्यांच्या या गुंडगिरीचे परिणाम त्यांना आगामी काळात भोगावेच लागणार आहे. भाजपविरोधात  आमचे आंदोलन सुरूच राहील. पण, मुंबई करांची होणारी गैरसोय पाहून हे आंदोलन थांबविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.