मुंबई : १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा, ३ मे ला राज्यात हनुमान चालीसा पठण आणि ५ जूनला अयोध्यावारी हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यक्रम ठरले आहेत. त्यात काही बदल होणार नाही, अशी माहिती मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे आज मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला मनसे सरचिटणीस, उपाध्यक्ष, प्रवक्ते, प्रमुख पदाधिकारी, मुंबई, ठाणे येथील विभाग अध्यक्ष आदी उपस्थित होते.
या बैठकीची माहिती देताना नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंतची डेड लाइन दिली आहे. मात्र, त्यापूर्वी १ मे रोजी औरंगाबाद येथे महासभा होणार आहे. या सभेसाठी काय काय तयारी करावी याची माहिती देण्यात अली. तसेच, ही सभा मोट्या प्रमाणात कशी होईल याचा विचार या सभेत करण्यात आला.
५ जूनला राजसाहेब अयोध्येला जाणार आहेत. त्याचेही प्लॅनिंग या बैठकीत करण्यात आले. ५ जूनला प्रवास कसा करायचा, तेथे गेल्यावर काय करायचे याची सर्विस्तर चर्चा झाली. या दौऱ्यासंदर्भात तेथील गृहमंत्रालय आणि केंद्रीय यंत्रणा यांना पत्र पाठविण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
३ मेला अक्षय तृतीय आहे. या दिवशी राज्यात मनसे कार्यकर्ते पोलिसांची परवानगी घेऊन ठिकठिकाणी हनुमान चालीसाचे पठण करणार आहेत, महाआरती करणार आहेत. याचे नियोजन झाले आहे. प्रत्येकावर जबाबदारी निश्चित करण्यात आली असून कशाप्रकारे काय करायचे याची तयारी सुरु आहे.
३ मे रोजी करण्यात येणाऱ्या हनुमान चालीसा पठण आणि कायदा सुव्यवस्थेवरून गृहमंत्र्यांची चर्चा सुरु आहे असे कळतंय. सरकार याबाबत काय निर्णय घेतील त्यावर आमचे पुढचे नियोजन अवलंबून आहे. सरकारच्या गाईडलाईन्स आल्यानंतर आम्ही त्यावर भाष्य करू, विचार विनिमय करू असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.