१५ ऑगस्टला पालकमंत्री नाही, शेतकरी झेंडा फडकवतील-सुकाणू समिती

सुकाणू समिती सरसकट कर्जमाफीसाठी १४ ऑगस्टला राज्यभर चक्काजाम करणार आहे. 

Updated: Aug 13, 2017, 07:48 PM IST
१५ ऑगस्टला पालकमंत्री नाही, शेतकरी झेंडा फडकवतील-सुकाणू समिती title=

मुंबई :  शेतकरी संघटनांची सुकाणू समिती, सरसकट कर्जमाफीसाठी १४ ऑगस्टला राज्यभर चक्काजाम करणार आहे.  या निर्णयानुसार राज्यात १४ ऑगस्टला चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.

तर १५ ऑगस्टला कुठल्याही जिल्ह्यात पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू दिले जाणार नाही, अशी माहिती शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या नेत्यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दिली.

संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी १५ ऑगस्टला शेतकरीच सर्व ठिकाणी ध्वजारोहण करतील, असेही त्या नेत्यांनी स्पष्ट केले. सरसकट कर्जमाफी देण्याच्या प्रश्नावर सरकारच्या विरोधातील आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्ज योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळेच सुकाणू समितीने पुन्हा तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसल्याची माहिती समितीचे नेते कॉ. अजित नवले, रघुनाथदादा पाटील, आ. बच्चू कडू, किशोर ढमाले आदींनी दिली.

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने यापूर्वी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला वाढता प्रतिसाद मिळाल्याने, कर्जमाफीबाबत ताठर भूमिका घेणाऱ्या फडणवीस सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली. मात्र, कर्जमाफी निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही.