शितपनं इमारतीचे पिलर्सच कापून टाकले होते, म्हणून...

सुनील शितप या महाभागानं आपल्या नर्सिंग होममध्ये असणारे इमारतीचे पिलर्सच कापून टाकले... आणि १७ जणांचे बळी घेतले... आता शितपला फाशीची शिक्षा देण्याची मागणी दुर्घटनेत बचावलेले रहिवासी करत आहेत.

Updated: Jul 26, 2017, 01:30 PM IST
शितपनं इमारतीचे पिलर्सच कापून टाकले होते, म्हणून...  title=

मुंबई : सुनील शितप या महाभागानं आपल्या नर्सिंग होममध्ये असणारे इमारतीचे पिलर्सच कापून टाकले... आणि १७ जणांचे बळी घेतले... आता शितपला फाशीची शिक्षा देण्याची मागणी दुर्घटनेत बचावलेले रहिवासी करत आहेत.

दुर्घटनेतून बचावले पण...

याबाबत आपण तक्रार करत सिताप यांना समजावण्याचाही प्रयत्न केला होता... परंतु, पैशांच्या जोरावर त्यानं आम्हाला धमकावलं, असं म्हणणं आहे घाटकोपर दुर्घटनेतून बचावलेल्या लालचंद रामचंदानी यांचं... तर तो शिवसेनेचा नेता आहे... पण त्याला मुंबई महानगरपालिकेनं इमारतीमध्ये काम करण्याची परवानगी दिली होती का? असा प्रश्न विचारतायत बिनिता रामचंदानी... आज आम्ही रस्त्यावर येऊन पडलोत, अशी चीड त्यांनी व्यक्त केलीय.

राजकीय वजन वापरून दादागिरी

रामचंदनी यांच्याप्रमाणेच या इमारतीच्या दुर्घटनेतून बचावलेल्यांच्या डोक्यावर आज छत उरलं नाही... रामचंदानी कालपर्यंत सिद्धी साई अपार्टमेंटमध्ये चौथ्या माळावर आपल्या कुटुंबासोबत गुण्या गोविंदानं राहात होते. आता इमारतच कोसळल्यानं सारं कुटुंब रस्त्यावर आलंय. सुनील शितपनं पालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सगळे नियम धाब्यावर बसवले. अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कधीच फायदा झाला नाही. सितापने आपले राजकीय वजन वापरुन सिद्धी साई इमारतीतील त्याचे काम सुरुच ठेवले.

रहिवाशांना धमक्या...

याच साई सिद्धी इमारतीत सुनिल सिताप आपल्या मर्जीला येईल ते करत होता. इमारतीत पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या वंदना सिंग यांच्या घराशेजारी जागा नसतानाही सुनिल सितापने दोन दरवाजे बनवले होते. त्याबाबत सुनिल सितापला वंदना सिंग यांच्या नवऱ्याने जाब विचारला असता सुनिल सितापने उलट वंदना यांच्या नवऱ्यालाच धमकावले.

पोलिसांना आढळला पुरावा

शिवसेनेचा स्थानिक नेता आणि गडगंज श्रीमंत सुनिल सितापला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, मृत्यूस कारणीभूत, मालमत्तेचे नुकसान तर बेजबाबदार कृत्य असे गुन्हे दाखल केले गेलेत. ज्या लोखंडी सपोर्टच्या आधारे सिद्धी इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरवरील पीलर्स तोडले गेले भिंती तोडल्या गेल्या, तोच लोखंडी सपोर्ट आता पुरावे म्हणून वापरणार असल्याचे पोलिसांनी सांगितलंय.

१७ जणांचे प्राण घेणाऱ्या १६ कुटुबांच्या डोक्यावरील छत हिरावून घेणाऱ्या या सुनिल सितापवर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता जोर धरु लागलीय.