'सुशांत आत्महत्याप्रकरणी तपासाचा अधिकार मुंबई पोलिसांनाच'

'रियाच्या खात्यात एक रुपयाही ट्रान्स्फर झाला नाही'

Updated: Aug 3, 2020, 01:42 PM IST
'सुशांत आत्महत्याप्रकरणी तपासाचा अधिकार मुंबई पोलिसांनाच' title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  ज्या राज्यात घटना घडली असेल  त्याच राज्याचे पोलीस संबंधित घटनेचा तपास करतात. त्यामुळे सुशांत आत्महत्या तपासाचा अधिकार कायद्याने मुंबई पोलिसांकडे असल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलंय. यामुळे बिहार पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह झालायं. सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांना होम क्वारंटाईन केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या भुमिकेवर संशय निर्माण झाला. यावर मुंबई पोलिसांतर्फे आता स्पष्टीकरण देण्यात आलंय. रियाच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर झाल्याच्या चर्चेलाही पुर्णविराम मिळालाय.

एखादी घटना घडल्यानंतर झालेल्या पोलीस तपासात पहिला जबाब हा महत्वाचा मानला जातो. सुशांतच्या घरच्यांशी झालेल्या पहिल्या जबाबात त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता. सुशांतवर सुरु असलेले उपचार आणि व्यावसायिक दडपणामुळे आत्महत्या केली असावी असे त्यांचे म्हणणे होते. पण त्यानंतर त्याच्या वडीलांना नंतर बिहारमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर सुशांतचे कुटुंबीय जबाबासाठी आले नाहीत आणि त्यांनी थेट बिहारमध्ये तक्रार केली.

सुशांत सिंहच्या खात्यातून रिया चक्रवर्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याच्या अनेक बातम्या समाज माध्यमात फिरत होत्या. पण रियाच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर न झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात आढळून आलंय. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे परमबीर सिंह म्हणाले.

लॉकडाऊनमध्ये सुशांतच्या घरी पार्टी झाली आणि त्यात अनेक मोठी नाव असल्याची चर्चा सुरु होती. यावर देखील मुंबई पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. याबाबत आम्ही अधिक कायदेशीर माहिती घेत आहोत. १३ अणि १४ जूनचे सुशांतच्या इमारतीचे सीसीटीव्ही फूटेज तपासले गेले पण पार्टीबाबत कोणतेच पुरावे आढळले नसल्याचे सांगण्यात आले. 

बिहार पोलिसांना होम क्वारंटाईन केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या कामावर संशय निर्माण करण्यात येतोय. अनेक राजकीय नेत्यांनीही यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. यावर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय. क्वारंटाईन करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. महापालिकेने कारवाई केली असून त्याबद्दल आम्हाला अधिक माहिती नसल्याचे स्पष्ट करणयात आले. 

सुशांत आत्महत्येप्रकरणात आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवून घेतले असून सर्वांची सविस्तर चौकशी करण्यात आली आहे. मुंबई पोलीस, वांद्रे पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत. आर्थिक, आरोग्यविषयक तसंच इतर सर्व बाबीच्या बाजूने तपास सुरू आहे. चौकशी काळात सुशांत सिंह च्या वडील, बहिण, मेहुणा या़चे जबाब घेतले गेले आहेत.