Terrorist Attack Plan : शिकवणीच्या आडून दहशतवादी कृत्य, अतिरेकी घातपाताचं मुंब्रा कनेक्शन

जान मोहम्मदच्या अटकेनंतर एटीएसने मुंबईतून आणखी दोघांना अटक केली आहे

Updated: Sep 20, 2021, 07:15 PM IST
Terrorist Attack Plan : शिकवणीच्या आडून दहशतवादी कृत्य, अतिरेकी घातपाताचं मुंब्रा कनेक्शन title=

मुंबई : मुंबईतील अतिरेकी घातपात कटाच्या तपासात मुंब्रा (Mumbra) कनेक्शन समोर आलं आहे. मुंब्रा इथून रिझवान मोमीन या संशयित अतिरेक्याला अटक करण्यात आली आहे. रिझवान हा बीएससी शिक्षित असून तो आपल्या घरीच दहावीपर्यंतची शिकवण्या घेत असे. मात्र या शिकवणीच्या आडून तो दहशतवादी कृत्यांना मदत करत असल्याचा आरोप एटीएस (ATS) ने ठेवला आहे. 

रिझवानने एटीएसच्या अटकेत असलेल्या जाकीर हुसेन शेखला दहशतवादी कृत्यात मदत केली असल्याची माहिती असून त्याचा मोबाईल त्याने तोडून पुरावा नष्ट कण्यासाठी गटारात फेकून दिला होता. तपासात एटीएसने हा तुटलेला मोबाईल शोधून काढला आहे. रिजवान याच्या मुंब्रा इथल्या घराची दहशतवाद विरोधी पथकाकडून घरझडती घेण्यात आली असता त्यामध्ये काही संशयास्पद दस्तऐवज मिळून आल्याने ते ताब्यात घेण्यात आले आहेत.

दिल्लीत सहा अतिरेकी अटक झाल्यानंतर मुंबई कनेक्शन उघड झालं होतं. मुबंईतल्या धारावीमधून जान मोहम्मद शेख या अतिरेक्याला अटक करण्यात आली होती. आता जान मोहमद शेखचे या दोघांसोबत आणि परदेशातील कनेक्शन तपासले जात आहेत.

जाकीर हुसेन शेख या अतिरेक्याला मुंबईतून अटक केल्या नंतर आज रिजवान मोमीनला  अटक करण्यात आली. जाकीर आणि रिझवान यांचे परदेशी अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. परदेशातील अॅंथोनी नामक अतिरेक्यांशी यांचे संबंध असल्याची माहिती असून  हा अतिरेकी कुख्यात गँगस्टर दाऊदच्या जवळचा आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

आज जाकीर आणि रिजवानला मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.