मुंबईत असं सुंदर आहे पर्यावरणपूरक रेल्वेचे एक स्थानक । पाहा

हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचे स्थानकाचं रुपडं बदलण्यात आले आहे.  

Updated: Jan 11, 2020, 06:15 PM IST
मुंबईत असं सुंदर आहे पर्यावरणपूरक रेल्वेचे एक स्थानक । पाहा

मुंबई : सध्या पर्यावरणपूरक रेल्वे स्थानक तयार करण्याकडे रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने विविध रेल्वे स्थानकावर प्रयत्न सुरू आहेत. हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाने (Kings Circle Station) यात पुढाकार घेत स्थानकाचं रुपडं बदलण्यात आले आहे. सुंदर बगीचा, स्वच्छ आणि नीटनेटके प्लॅटफॉर्म आणि सुशोभित परिसर असलेले, इतर स्टेशनला आदर्श ठरणारे मध्य रेल्वेचे (Central Railway) किंग्ज सर्कल स्टेशन.

लिली, गुलाब, जास्वंद, चाफा, मोगरा ही सुंदर फुलझाडं,विविध प्रकारच्या वेली, भिंतींवर प्राण्यांची चित्र रंगवलेली आणि बसायला बाकडे एखाद्या नयनरम्य अशा बगीचात तर आपण नाही ना असं वाटावं. मात्र हा छोटासा बगीचा आहे हार्बर मार्गावरील किंग सर्कल या स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक शेजारचा. ही किमया केली रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक एन के सिन्हा आणि त्यांच्या इतर कर्मचारी वर्गाने. त्यांनी सांगितले, प्रवाशांनी चांगली साथ दिली आहे. त्यामुळे हे शक्य झाले.

बगिच्या सोबतच रेल्वे स्थानक, आजूबाजूचा परिसर सुंदर, स्वच्छ रहावा यासाठी भिंती, पायऱ्या  रंगवण्यात आल्यात. त्यासोबतच सामाजिक संदेशही देण्यात आलेत. स्वच्छ, सुंदर अशा रेल्वे स्थानकामुळे प्रवासीही समाधानी आहेत

यापूर्वी किंग्ज सर्कल हे स्थानक भकास स्थानक म्हणून ओळखलं जात होतं या स्थानकावर चर्सी गर्दुल्ल्यांचा वावरही असायचा मात्र ईच्छा शक्ती आणि सातत्य असेल तर भकास स्थानकाला कसं झकास करता येईल हेच किंग सर्कल स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले.