मराठा क्रांती मोर्चा उद्या मंत्रालयावर धडकणार

मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक

Updated: Aug 25, 2019, 09:01 PM IST
मराठा क्रांती मोर्चा उद्या मंत्रालयावर धडकणार

कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई : मराठा क्रांती मोर्चा उद्या मंत्रालयावर धडकणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पण त्याचे लाभ मराठा समाजातल्या तरूणांना मिळत नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाकडून उद्या मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळालं पण आरक्षणाची फळं मराठा समाजाचा तरुणांना चाखायला मिळाली नाहीत, असा मराठा क्रांती मोर्चाचा आरोप आहे. २०१४ पासून आरक्षणाचा फायदा घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांना अजूनही सरकारी नोकऱ्यांमध्ये हजर करवून घेतलं नाही. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही सरकारी अधिकारी ऐकत नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाकडून मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

काही अधिकारी मराठा समाजाला आरक्षणाचे आणि सरकारी सवलतींचे लाभ मिळूच नये, यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. आंदोलन काळातले गुन्हे मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही मागे घेत नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे म्हणणे आहे.

सारथी ही संस्था फक्त मराठा समाजाच्या विद्यार्थी आणि तरूणांसाठीच राखीव ठेवावी अशी मागणी आहे. मराठा क्रांती मोर्चाने मोठा लढा उभारून आरक्षणाचा हक्क मिळवला. पण त्याचा लाभ मराठा तरूणांना होत नसल्याने मराठा मराठा क्रांती मोर्चा पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे.