मुंबई : डोंगरी येथे कोसळलेली इमारत ही म्हाडाची नसल्याचा दावा इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी केला आहे. म्हाडाच्या इमारतीच्या मागे ही इमारत आहे. धोकादायक इमारत आम्ही खाली केली आहे. कोसळलेली इमारत ही एका ट्रस्टची इमारत आहे. ती इमारत म्हाडाची नाही. शिवाय ही इमारत अनधिकृत असल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली आहे. अशी माहिती देखील विनोद घोसाळकर यांनी दिली आहे. त्यामुळे आता दुर्घटनेसाठी जबाबदार कोण असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.
मुंबईच्या डोंगरी परिसरात १०० वर्ष जुनी म्हाडाची चार मजली इमारत कोसळली आहे. केसरबाई असं या इमारतीचं नाव आहे. डोंगरी इथल्या अब्दुल रहमान शाह दर्ग्याच्या मागे ही इमारत होती. कोसळलेल्या या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ५० जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याचं कळतं आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आलंय. पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
'सध्याची प्राथमिकता ही इमारत बचावकार्य पूर्ण करण्याची असेल. मात्र विकसकाने अजून इमारतीचा पुनर्विकास का केला नव्हता याची चौकशी केली जाईल असं म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितलं.