प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : विरारमध्ये (Virar News) रेल्वे रुळ (Railway track) ओलांडताना एकाच घरातील तिघांच्या जीवावर बेतले आहे. रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनची धडक बसल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. विरार रेल्वे स्थानकावर घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एकाच कुटंबातील तिघांचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात एका तीन महिन्यांच्या चिमुकल्याचाही जीव गेला आहे.
मृतांमध्ये एक पुरुष एक महिला आणि तीन महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीच्या सुमारास विरार रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर लागलेल्या ट्रेन मधून विरुद्ध दिशेने उतरून हे कुटुंब रेल्वे रूळ ओलांडत होते. यावेळी वेगात येणाऱ्या मेलने तिघांना जोरदार धडक दिली. या धडकेत अख्ख कुटुंबच संपलं आहे. रेल्वेची धडक इतकी भीषण होती की महिला पुरुषासह तीन महिन्यांच्या बाळाचाही मृत्यू झाला आहे. अजित कुमार पटेल, सीमादेवी पटेल आणि आर्यन पटेल असे मृतांची नावे असल्याचे समोर आले आहे. वसई येथे राहणारे पटेल कुटुंबिय सूरत येथे नातेवाईकांकडे गेले होते. सूरतवरुन परतल्यानंतर पटेल कुटुंबिय विरार येथे उतरले होते. त्यावेळीच हा भीषण अपघात झाला.
धावत्या रेल्वेत लूटमार
दुसरीकडे मनमाड - कोपरगाव रेल्वे स्थानकादरम्यान दानापुर - पुणे एक्सप्रेच्या जनरल बोगीमध्ये पाच ते सहा चोरट्यांनी प्रवाशांना ऑपरेशन ब्लेडचा धाक दाखवत लुटल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी प्रवाशांचे 10 मोबाईल, रोख रक्कम व सोन्याचे पॅन्डल, चांदीची चैन, ब्रेसलेट असा दीड लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला होता. 10 मार्च रोजी रात्री सव्वा दहा ते पावणे अकरा वाजेदरम्यान हा प्रकार घडला होता.
आरोपींना पकडण्याचे मोठं आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते. मनमाड लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी शिर्डी येथे सापळा रचून पाच चोरट्यांना शिताफीने अटक करत त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मुद्देमलापैकी चांदीची चैन, ब्रेसलेट, पदक, पॅन्डल, वेगवेगळ्या कंपनीचे 8 मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 1 लाख 13 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.