नीलम गोऱ्हे यांना पुन्हा डावललं... महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत नावच नाही

Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा एककल्ली कारभार सुरु आहे, विधीमंडळ परिसरातील कार्यक्रमांबाबत आपल्याला माहिती दिली जात नाही, आपल्याला विश्वासात घेत नाहीत, असा दावा विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. 

Updated: Mar 24, 2023, 01:19 PM IST
नीलम गोऱ्हे यांना पुन्हा डावललं... महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत नावच नाही title=
(फोटो सौजन्य - PTI)

Maharashtra Bhushan : पद्म विभूषण गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना राज्य सरकारतर्फे (Maharashtra Government) महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच नवा वाद सुरु झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रम पत्रिकेवरुन विधान परिषदेत (Legislative Council) मानपमान नाट्य झाल्याचे पाहायला मिळालं आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. मात्र विधिमंडळातील गदारोळ काही संपण्याचे नाव घेत नाहीये. आशा भोसले यांना प्रदान केल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात निमंत्रण आहे की नाही असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. विधान परिषद उपसभापती आणि दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते यांचं या कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यामुळे विरोधक सभागृहात आक्रमक झाले होते. याआधीही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्याच्यांवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा विधान परिषदेत वाचला होता.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील सभागृहाचे अध्यक्ष आणि सभापती यांच्या अधिकारांवरून चर्चा झाली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या पत्रिकेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांचे नाव नसल्याचे समोर आले. त्यामुळे विरोधकांनी सभागृहात मोठा गोंधळ घातला. यावेळी विरोधकांना आणि सभापतींना वारंवार डावलं जात आहे अशी नाराजी विरोधकांनी व्यक्त केली. विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृह पाऊण तास तहकूब करण्यात आले होते. दुसरीकडे या कार्यक्रमात जाऊन सरकार विरोधात काळे झेंडे दाखवण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्य सरकारकडून कोणत्याही क्षेत्रात सचोटीने काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. 2021 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x