मुंबईकरांची कोंडी! दुरुस्तीसाठी पूल बंद पण, पुनर्बांधणीचं काय?

मुंबईकरांना वाहतूककोंडीला सामोरं जावं लागणार... 

Updated: Nov 20, 2018, 09:59 AM IST
मुंबईकरांची कोंडी! दुरुस्तीसाठी पूल बंद पण, पुनर्बांधणीचं काय?  title=

कृष्णात पाटील, झी मीडिया मुंबई : मुंबईतील शीव उड्डाणपूल १ डिसेंबरपासून दुरुस्तीसाठी बंद ठेवला जाणार असून येत्या काळात मुंबईतील सुमारे २० पुलांची तातडीनं दुरुस्ती आणि पुनर्बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईत रस्ते वाहतुकीचा चांगलाच बोजवारा उडणार आहे.

दक्षिण मुंबईतील हँकाक पूल... गेल्या सव्वा तीन वर्षांपासून पाडून ठेवला असला तरी त्याचे बांधकाम अद्यापही सुरू झालेले नाही. लोअर परळ इथला रेल्वे पूल बंद केल्यानंतर इथल्या वाहतूक कोंडीने मुंबईकरांना जेरीस आणलं. आता तर वाहतुकीच्या दृष्टीनं सर्वाधिक महत्वाचा असणारा शीवचा उड्डाणपूलही दुरूस्तीसाठी बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीत आणखी भर पडणार आहे. तसंच रेल्वेच्या अखत्यारीतील ग्रँट रोड, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, प्रभादेवी आणि दादरचा टिळक पूल हे पाच पूलही धोकादायक असल्यानं ते पाडून पुन्हा बांधले जाणारेत. तसंच पालिकेच्या अखत्यारितील एकूण १५ पूल पाडून नव्याने बांधले जाणार आहेत. यापैंकी आठ पादचारी पूल आहेत. 

यातील बहुतांशी पूल पश्चिम आणि पूर्व उपनगरातील आहेत. त्यामुळं आता दक्षिण मुंबईबरोबरच उपनगरवासियांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. आता या पुलांच्या पुनर्बांधणीवरून राजकारणही सुरू झालंय. पालिकेनं यापूर्वीच नियोजन करून टप्याटप्याने हे सर्व पूल बांधले गेले असते तर मुंबईकरांची त्रासातून सुटका झाली असती, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर विरोधकांनी व्यक्त केलंय.

मेट्रोची कामे मुंबईत सर्वत्र सुरू असल्यानं वाहतूक कोंडीत भर पडलीय. त्यातच आता दुरूस्ती आणि पुनर्बांधणीसाठी पूल बंद ठेवले जाणार असल्यानं वाहतुकीचे तीन-तेरा वाजणार आहेत.