Maharashtra Weather News : मुंबई वगळता उर्वरित राज्यात पुन्हा वाढला गारठा; उत्तर भारतात रक्त गोठवणाऱ्या थंडीची लाट

Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट,  सुट्टी आणि हिवाळ्याचे दिवस पाहता कुठं सहलीला जायचा बेत असेल तर आधी पाहा हवामानाचा सविस्तर अंदाज...   

सायली पाटील | Updated: Jan 4, 2025, 07:13 AM IST
Maharashtra Weather News : मुंबई वगळता उर्वरित राज्यात पुन्हा वाढला गारठा; उत्तर भारतात रक्त गोठवणाऱ्या थंडीची लाट  title=
Maharashtra Weather News temprature drop down and cold wave intensifies

Maharashtra Weather News : राजधानी दिल्लीसह सध्या संपूर्ण भारतात थंडीचा कडाका वाढत असताना इथं महाराष्ट्रातही पुन्हा एकदा गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. आयएमडी अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभागानं अनेक राज्यांमध्ये धुक्याचा ऑरेंज अलर्ट जारी केल्यामुळं त्याचा वाहतुकीवरही थेट परिणाम दिसत आहे. 

उत्तरेकडील राज्यांमध्ये वाढणारा थंडीचा कडाका आता देशभरात परिणाम करताना दिसत असून, तिथून वाहणाऱ्या शीतलहरी आता महाराष्ट्रापर्यंत धडकल्या असून, राज्यातही किमान तापमानात पुन्हा एकदा घट होण्यास सुरुवात झाली आहे. कोकण क्षेत्रात तापमानात चढ उतार होत असून या प्रणालीला सध्या पश्चिमी झंझावात कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. 

मागील काही दिवसांपासून राज्यावर अवकाळीचं सावट होतं. आता मात्र हे सावटही सरताना दिसत असून, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात पारा घसरताना दिसत आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये मात्र दुपारच्या वेळी उन्हाचा दाह वाढत असल्याचं स्पष्ट होत आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यात थंडी आणखी जोर धरणार असून किमान तापमानाचा आकडा 10 अंशांहूनही कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मुंबईत नोंदवण्यात आला मागील 7 वर्षांतील सर्वात उष्ण शुक्रवार 

शुक्रवारी पहाटे किमान तापमानात घट झाल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला. असं असलं तरीही सूर्य डोक्यावर आल्यानंतर मात्र उर्वरित संपूर्ण दिवसभर शहरात नागरितांना उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागला. ज्यामुळं शुक्रवार हा मागील सात वर्षांतील जानेवारी महिन्यातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला. शहरातील सर्वाधिक तामपानाची नोंद सांताक्रूझ इथं करण्यात आली असून, इथं पाहा 36 अंशांवर पोहोचला होता. पुढील दोन दिवस शहरात ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.