दीपाली जगताप पाटील, झी २४ तास, मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात गणेशमंडपाच्या सुरक्षेत मंडळाचे कार्यकर्तेही दिसणार आहेत. पोलीस मंडळाच्या कार्यकर्त्यांना सुरक्षेसंदर्भातलं प्रशिक्षण देणार आहेत. त्यामुळं आता मंडळाच्या बाहेर तुम्हाला कार्यकर्ते सावधान स्थितीत दिसू लागणार आहेत. मुंबईतले गणेशमंडळाचे कार्यकर्ते म्हटलं तर अतिशय हौशी... गणेशोत्सवाच्या काळात मंडपात काहीही काम नसताना या कार्यकर्त्यांत मोठी लगबग असते. मात्र यंदापासून या कार्यकर्त्यांना पोलिसांचं काम करावं लागणार आहे. मुंबई पोलिसांनी गणेशमंडळांच्या कार्यकर्त्यांनो सुरक्षेच्या कामाला लावलंय.
मंडळाच्या ८ ते १० कार्यकर्त्यांना पोलीस प्रशिक्षण देणार आहेत. मोठ्या मंडळाना सीसीटीव्ही, मेटल डिटेक्टर बंधनकारक करण्यात आलेत. खासगी ड्रोनला बंदी घालण्यात आलीय. प्रसाद स्वीकारतानाही खबरदारी घेण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मुंबई - पुण्यातला गणेशोत्सव पाहण्यासाठी लाखो भाविक येत असतात. गणेश मंडळांचे कार्यकर्ते आता सुरक्षेची खबरदारी घेणार असल्यानं गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडणार यात शंका नाही. शिवाय पोलिसांच्या डोक्यावरचाही ताण थोडा फार हलका होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.