दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ IAS अधिकाऱ्यांनी आपल्याच मुलांना मिळवून दिला आहे. यात IAS अधिकारी श्याम तागडे आणि मिलिंद शंभरकर यांचा समावेश आहे. श्याम तागडे आणि मिलिंद शंभरकर यांनी आपल्याच मुलांना सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्तीचा फायदा करून दिला आहे.
सध्या IAS श्याम तागडे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आहेत, त्यांनी आपला मुलगा आरुष तागडे याला सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती अंतर्गत ऑस्ट्रेलियामधील सिडनी विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून दिला आहे.
तर IAS मिलिंद शंभरकर यांनी त्यांची मुलगी गाथा शंभरकर हिला अमेरिकेतील विद्यापीठात या योजनेचा फायदा मिळवून दिला, यापूर्वी तत्कालीन सचिव दिनेश वाघमारे आणि सहसचिव दिनेश डिंगळे यांनी अशाच पद्धतीने आपल्या मुलांना फायदा मिळवून दिला होता.
तर तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनीही आपल्या नातेवाईकाला लाभ मिळवून दिला होता, मात्र टीका झाल्यावर हे नाव वगळण्यात आले होते. अनुसूचित जातीतील गरीब मुलामुलींसाठी असलेल्या योजनेचा लाभ अधिकारीच घेत असल्याचा पुन्हा एकदा समोर आले आहे.