मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली. पोलीस यंत्रणांना देखील याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या या हल्ल्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी आता या प्रकरणात कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पवारांच्या घरावर झालेल्या या आंदोलनावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 'या जन्मी जे करतो ते याच जन्मी फेडावे लागते, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याबाबत प्रतिक्रीया दिली आहे. या गोष्टीपासून कोणी वाचू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
एसटी कर्मचा-यांचं पवारांच्या घराबाहेरचं आंदोलन (ST workers Protest) चिघळल्यानंतर सुप्रिया सुळे तातडीनं सिल्व्हर ओकवर पोहोचल्या. सुप्रिया सुळेंनी अक्षरशः हात जोडून आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं. पण आंदोलक शांत झाले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी 100 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
एसटी कर्मचा-यांच्या पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. कुणी जर चुकीचा रस्ता कुणी दाखवत असेल, तर त्या रस्त्याला विरोध करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. तातडीनं तुमच्यापैकी अनेक सहकारी इथं पोहोचले. त्यासाठी मी काही वेगळं सांगायची गरज नाही. संकट आलं तर आपण सगळे एक आहोत, हेच तुम्ही दाखवून दिलंत. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.' अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.