केंद्राच्या निकषापेक्षा शेतकऱ्यांना वाढीव मदत, पाहा जिरायती-बागायतीला किती मदत

राज्यमंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक आज वर्षा निवासस्थानी पार पडली. नुकसानग्रस्त पाहाणीचा आज आढावा घेण्यात आला.

Updated: Oct 23, 2020, 03:03 PM IST
केंद्राच्या निकषापेक्षा शेतकऱ्यांना वाढीव मदत, पाहा जिरायती-बागायतीला किती मदत

मुंबई : राज्यमंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक आज वर्षा निवासस्थानी पार पडली. नुकसानग्रस्त पाहाणीचा आज आढावा घेण्यात आला. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. केंद्राकडून राज्याचे हक्काचे ३० हजार ८०० कोटी येणे बाकी असले, अतिवृष्टीने नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटीची मदत हे सरकार जाहीर करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

यात यापूर्वी केंद्राचे जे मदतीचे निकष होते, त्यात जेवढी रक्कम दिली जात होती, त्यापेक्षा जास्त मदत आपण शेतकऱ्यांना करत आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यात जिरायती आणि बागायती क्षेत्रासाठी यापूर्वी केंद्राकडून जिरायत, बागायती या क्षेत्रासाठी ६ हजार ८०० प्रति हेक्टर (२ हेक्टरसाठी मर्यादीत) मिळत होते. आता १० हजार रूपये प्रति हेक्टर (२ हेक्टरसाठी मर्यादीत) भरपाई दिली जाणार आहे. 

फळपिकांसाठी भरपाई यापूर्वी प्रति हेक्टर १८ हजार प्रति हेक्टर भरपाई दिली जात होती, ती आता आम्ही २५ हजार प्रति हेक्टर जाहीर करीत आहोत, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. ही मदत प्रति २ हेक्टरसाठी मर्यादीत असते.

दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये ही मदत पोहोचवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच केंद्राकडून राज्याला ३८ हजार कोटी रुपये येणे बाकी असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यासाठी आपण महाराष्ट्र सरकार म्हणून वेळोवेळी केंद्राला स्मरणपत्रं दिलेली आहेत. राज्याचे हक्काचे ३८ हजार कोटी रुपये येणे बाकी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

आपले हक्काचे पैसे केंद्राकडून येण्याचे बाकी असले, तरी नैसर्गिक संकटं येणं थांबत नाहीत, हे देखील कटू सत्य असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ही जी आपत्ती आलेली आहे. यावर माझ्या शेतकऱ्यांना शब्द दिला होता, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, असं म्हटलं होतं, तो शब्द आम्ही पूर्ण करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ज्यांची जमीन खरडून गेली, वाहून गेली, पिकं वाहून गेली, पडली, मोठं नुकसान झालं, या सर्वांसाठी आम्ही शेतकऱ्यांना १० हजार कोटीची मदत जाहीर करत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. केंद्राकडून पुरेशी मदत नसतानाही आम्ही शेतकऱ्यांसाठी जे जे शक्य आहे, ते आम्ही करूच, असं आम्ही म्हटलंय आणि ते आम्ही पूर्ण करु.