Sharad Pawar On Uddhav Thackeray : महाविकासआघाडी (Mahavikasaaghadi) हा राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा राजकीय प्रयोग ठरला. महाविकास आघाडीची मोट बांधण्यात आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री बनवण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar ) यांचा मोलाचा वाटा होता. मात्र, आता पवारांच्या पुस्तकानं दोघांमध्ये वितुष्ट येण्याची शक्यता आहे. पवारांनी उद्धव ठाकरेंबाबत लिहिलेली काही वाक्य त्यांच्या जिव्हारी लागल्याची चर्चा आहे.
शरद पवारांमुळे उद्धव ठाकरेंची पुन्हा कोंडी झाली आहे. याला निमित्त ठरलंय पवारांचं पुस्तक. 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्रातून पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत थेटपणे खंत व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंची कार्यपद्धती काहीसा नापसंतीचा सूर लावणारी होती असही पवारांनी आपल्या पुस्तकात म्हंटले आहे. पवारांचा हाच पुस्तक बॉम्ब ठाकरे आणि राऊतांच्या जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे.
1 मुख्यमंत्री असताना त्यांचं मंत्रालयात फक्त दोनदा जाणं आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं.
2 बाळासाहेबांसमवेतची संवादातली सहजता उद्धवशी बोलताना नव्हती. त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा, प्रकृती याचा विचार करूनच भेटण्याची वेळ ठरवावी लागत असे.
3 मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो असंही पवारांनी म्हंटलंय. पवारांच्या विधानानं ठाकरेंच्या आरोपांना थेट छेद दिलाय.
4 उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यानं शिवसेनेतच वादळ माजेल, याचा मात्र आम्हाला अंदाज नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्त्व कमी पडलं. संघर्ष न करता उद्धवनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला.
पवारांची ही रोखठोक भूमिका ठाकरेंच्या फारशी पचनी पडलेली नाही. त्यांनीही शरद पवारांना चांगलाच टोला लगावला. पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीला तडा जाणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मविआला तडा जाईल असं राष्ट्रवादीकडूनही काही होणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. तर पवारांनी आधी राजीनाम्याबद्दल ठरवू दे, मग आपण त्यावर बोलू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
खरं तर मविआची मोट बांधण्यात आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यात शरद पवारांचा मोलाचा वाटा राहिलाय. मात्र, पुस्तकाच्या निमित्तानं ठाकरे-पवारां आमने सामने येण्याची शक्यता आहे. हा वाद विकोपाला गेला तर त्याचा परिणाम मविआवरही होणार यात शंका नाही.