मुंबई: जीवावर उदार होऊन स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करु नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परराज्यातील मजुरांना केले आहे. औरंगाबादमधील रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले. औरंगाबादमध्ये आज पहाटे एका मालगाडीने रुळावर झोपलेल्या १९ मजुरांना चिरडले. यामध्ये १६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आपल्या गावी पायी चालत निघालेल्या मजुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मजुरांना उद्धव ठाकरे यांनी आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, गेल्या ४-५ दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागातून विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहे. त्यातून सुमारे एक लाख लोक आपापल्या गावी सुखरूप पोहचले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत राज्यात अडकलेले सर्व श्रमिक व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचतील असे नियोजन झाले असून रेल्वेशी सातत्याने समन्वय सुरु आहे. नुकतीच मुंबईहून रेल्वे सोडण्याचा निर्णयही झाला असून त्यामुळेही अनेक मजूर घरी परततील. मात्र जीवावर उदार होऊन, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका असे आवाहन परत एकदा मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
परराज्यातील सर्व मजुरांसाठी निवाऱ्याची व्यवस्था त्या त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे, त्याठिकाणी अगदी शेवटचा मजूर घरी जाऊस्तोवर आम्ही त्यांची जेवणाची आणि वैद्यकीय उपचाराची सोय करतो आहोत, त्यामुळे आपली निवारा केंद्रे सोडून लगेच बाहेर पडू नका. रेल्वेच्या वेळापत्रकाविषयी आपल्याला रेल्वे आणि सरकारमार्फत व्यवस्थित माहिती दिली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. जीवावर उदार होऊन जोखीम पत्करु नका, असं आवाहन मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मजुरांना केलं आहे.