'जनतेला दाखवलेल्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती न झाल्यास जनता दणका देते'

स्वप्न दाखवणारी नेतेमंडळी जनतेला आवडतात, त्यांना जनतेची पसंती मिळते. पण....

Updated: Jan 28, 2019, 07:32 AM IST
'जनतेला दाखवलेल्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती न झाल्यास जनता दणका देते' title=

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी भाजपा प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचा स्थापना सोहळ्याला उपस्थिती लावली होती. त्यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी राजकीय नेतेमंडळींविषयी एक लक्षवेधी वक्तव्य केलं. स्वप्न  दाखवणाऱ्या नेतेमंडळींना जनतेची पसंती मिळते खरी. पण, ही स्पप्न पूर्ण न झाल्यास याच जनतेचा रोषही ओढावला जातो, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. 

'स्वप्न दाखवणारी नेतेमंडळी जनतेला आवडतात, त्यांना जनतेची पसंती मिळते. पण, जर का ही स्वप्न पूर्ण झाली नाहीत तर मात्र याच राजकीय पटलावर जनता नेतेमंडळींना दणकाही देते', असं ते म्हणाले. इतर नेतेमंडळी आणि अप्रत्यक्षरित्या विरोधी पक्षांविषयी वक्तव्य करत असतानाच त्यांनी स्वत:विषयीसुद्धा सूचक विधान केलं. मी फक्त स्वप्न दाखवत नाही तर, ती पूर्णत्वासही नेतो, असं ते म्हणाले. 

मुंबईतील माध्यमांचे बरेच प्रतिनिधी मला ओळखत असून, एक व्यक्ती म्हणून मी कसा आहे हे ते चांगलच जाणतात, असं म्हणत कशा प्रकारे आपण घोषित प्रकल्प पूर्ण केले आहेत हे त्यांनी पाहिलं असल्याची बाबही गडकरींनी अधोरेखित केली. 

महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीपदावर असतेवेळी मुंबईत ५० उड्डाण पूलांचं बांधकाम करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला तेव्हा अनेकांनीच माझी खिल्ली उडवली होती. पण, आपण दिलेल्या आश्वासनांना आणि मांडलेल्या प्रस्तावांना, प्रकल्पांना पूर्णत्वास नेत त्यांचा चुकीचं ठरवल्याचं गडकरी यांनी स्पष्ट केलं. 

गडकरींची उपस्थिती असणारा हा कार्यक्रम आणखी एका कारणामुळे चर्चेचा विषय ठरला. कारण ठरलं ते म्हणजे अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा भाजपा प्रवेश. नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या महिला कार्याध्यक्षपदी ईशा कोप्पीकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना भाजपच्या रस्ते वाहतूक सुरक्षेची ब्रॅण्ड ऍम्बेसेडरपदीही नेमण्यात आलं आहे.