नवी मुंबई : कलेची आवड असणारे काही तरुण एकत्र आले... आणि त्यांच्या कलेला एक वेगळीच झळाळी मिळाली. याच तरुणांनी आपली कला लोकांसमोर सादर करण्यासाठी एक 'स्केचफेस्ट' आयोजित केलंय.
असं म्हणतात की कलाकाराला आपलं म्हणणं मांडण्यासाठी शब्दांची गरज भासत नाही कारण आपल्या कलेतूनच तो बऱ्याचदा व्यक्त होतो. आवड एक असल्यानं हे तरुण दर रविवारी सकाळी एकत्र जमतात... आणि आपल्या नजरेतलं चित्र कागदावर रेखाटतात आणि त्यात रंगही भरतात. आत्तापर्यंत तब्बल ४९ वेळा या कलाकारांनी एकत्र येऊन आपले विचार शेअर केलेत. आता आपल्या ५० व्या भेटीसाठी ते उत्सुक आहेत. कारण या ५० व्या भेटीनिमित्तानंच त्यांनी आपली कला लोकांसमोर सादर करण्यासाठी 'यूएसएनएम स्केचफेस्ट २०१७'चं आयोजन केलंय.
आज (शनिवारी) सकाळी या 'स्केचफेस्ट'चं उद्घाटन झालं. रविवारी १० सप्टेंबर रोजीही ते सुरू राहील. यासाठी सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशननजिक असणाऱ्या 'अर्बन हाट'मध्ये कलाप्रेमींना भेट देता येईल. यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.
प्रसिद्ध आर्किटेक्ट आणि स्केचर संजीव जोशी, मौप्रियम सेठ आणि हरि मोहन पिल्लई यांचादेखील या कार्यक्रमात सहभाग असणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, लहान मुलांसाठी दोन दिवस अनेक प्रोफेशनल कलाकारांकडून वर्कशॉपही भरवण्यात येणार आहेत.
२६ कलाकारांनी रेखाटलेल्या, रंगवलेल्या जवळपास ३०० कलाकृती या 'स्केचफेस्ट'च्या निमित्तानं कलाप्रेमींना पाहायला मिळणार आहेत. तरुण कलाकारांना आणि त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी अशा कार्यक्रमांचं आयोजन महत्त्वाचं असल्याचं इथं येणाऱ्या प्रत्येक कलाकाराचं म्हणणं आहे.