मुंबईकरांसाठी मोठी बातमी! लसीकरण संबंधित सर्वात मोठी बातमी

मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आता त्यांना कोरोनाची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रात जाण्याची गरज लागणार नाही.

Updated: May 5, 2021, 08:36 PM IST
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! लसीकरण संबंधित सर्वात मोठी बातमी

मुंबई : मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आता त्यांना कोरोनाची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रात जाण्याची गरज लागणार नाही. लवकरच हाउसिंग सोसायटींमध्ये लसीकरण सुविधा दिल्या जाऊ शकतात. मुंबई महानगरपालिकेने मोठ्या सोसायट्यांना खासगी रुग्णालयांसोबत टाय अप करण्याची परवानगी दिली आहे.

परंतु यासाठी, सर्वप्रथम रुग्णालयांना याची खात्री करुन घ्यावी लागेल की, त्यांच्याकडे पुरेसा लसींचा साठा  उप्लब्ध आहे की नाही. तसेच ज्या सोसायटींमध्ये लसीकरण कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, तेथे कोरोना नियमांचे पालन करण्याची पूर्ण सुविधा आणि व्यवस्था आहे की नाही? खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी सरकारने आधीच दर निश्चित केला आहे.

लसीकरण कार्यक्रमाच्या व्यवस्थेबाबत अनेक सोसायट्यांनी पालिकेशी चर्चा सुरू केली आहे, तर काही सोसायट्यांनी स्वतः लसीकरण कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे. मुंबईचे अतिरिक्त आयुक्त, सुरेश काकानी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. "काकांनी म्हणाले की, कोणतीही गृहनिर्माण संस्था, औद्योगिक उद्यान, बँका, मोठ्या कंपन्या एखाद्या खासगी रुग्णालयाशी टाय अप करु शकतात आणि त्यांच्या सुविधांनुसार त्यांच्या परिसरात लसी देऊ शकतात."

75 खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी

75 खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. अर्ज करून अधिक रुग्णालयांना याची परवानगी मिळू शकते. रुग्णालयांना यासाठी काही व्यवस्था कराव्या लागतील. लसीची प्रतीक्षा, लसींसाठी जागा आणि रूग्णांच्या निरीक्षणासाठी रुग्णालयांना व्यवस्था करावी लागेल. या व्यतिरिक्त, लसीकरण आणि कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी रुग्णालयांना पूर्ण व्यवस्था तयार करावी लागेल.

केवळ महानगर आणि सरकारी केंद्रांवर मोफत लस उपलब्ध असेल

ज्यांना मोफत लस घ्यायची आहे त्यांना बीएमसीने ठरवून दिलेल्या 227 लसीकरण केंद्रांवर जावे लागेल. येथे लस विनामूल्य उपलब्ध असेल, परंतु लस उपलब्ध असेल तरच लस केंद्रांमध्ये लस दिली जाईल. म्हणूनच, लसीकरण केंद्रावर लसीची उपलब्धता जाणून घेतल्यानंतरच, लसीकरण केंद्राला भेट देण्याचा सल्ला दिला जात आहे.

बर्‍याच हाउसिंग सोसायट्यांमध्ये अशी स्पर्धा सुरू आहे की, कोणती सोसायटी मुंबई महापालिकाकडून लसीकरण केंद्र सुरू करण्यात यशस्वी होईल. अनेक हाउसिंग सोसायट्या मुंबई महानगरपालिकेशी संपर्क साधत आहेत. परंतु पालिकेच्या वतीने हे स्पष्ट केले जात आहे की, लसीकरण केंद्र सुरू करण्यात महानगरपालिका शक्य तितक्या हाउसिंग सोसायट्यांना मदत करू शकते, परंतु लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांना खासगी रुग्णालयांशी संपर्क साधावा लागेल.