Kaithal Modified Thar: आजकालच्या तरुणांमध्ये गाडी मॉडिफिकेशन करण्याचा ट्रेण्ड इतका वाढलाय की मूळ गाडी कोणती, ही गाडी कोणती? हे ओळखणे कठीण होऊन जाते. तरुण आपल्या गाड्यांना अशाप्रकारे मॉडिफाइड करतात की ट्रॅफीक नियमांची मोडतोड करुन टाकतात. कोणी बुलेटला सायलेन्सर लावतात तर कोणी गाडीला मोठे टायर लावतात.तरुणांच्या वेगळ्या आवडीमुळे नियम धुळीस मिळालेले दिसतात.
असेच मॉडिफिकेशनचे एक प्रकरण हरयाणाच्या कॅथल येथून समोर आले आहे. ज्याबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. समोर आलेल्या माहितीनुसार, ट्रॅफिक पोलिसांनी एका 24 इंचाचे टायर लावलेली जीप थांबवली. त्यावर कारवाई केली. पोलिसांनी या वाहन चालकाला दंड ठोठावला. हा दंड 1-2 हजार इतका नव्हता तर तब्बल 23 हजार इतका होता. गाडीचे कोणतेच कागदपत्र चालकाकडे नव्हते. वाहतूक नियमांच्या विरोधात जाऊन गाडी मॉडिफाइड करण्यात आली होती. गाडीचे टायर साधारण 2 फूट रुंद होते. या सर्व कारणांमुळे गाडी जप्त करण्यात आली.
गाडीच्या मागे-पुढे मोठ्या अक्षरांनी विशिष्ट जातीवाचक शब्द लिहिले होते. याशिवाय अनेक अशा गोष्टी लावल्या होत्या, ज्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होईल. इथपर्यंत सर्व ठिक होतं. पण पुढे जे घडलं ते समजल्यावर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
पोलिसांनी या गाडीचे कागदपत्र तपासायला सुरुवात केली. त्यावेळी ही गाडी थार नसून 19 वर्षे जुनी बोलेरो असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. बोलेरो गाडीचा अपघात झाला होता. यानंतर ही गाडी भंगारात विकण्यात आली होती. पुढे चालकाने भंगार वाल्याकडून ही गाडी विकत घेतील. तिला नव्या थारप्रमाणे डिझाइन केले. सध्या गाडीचे चालान कापून जप्त करण्यात आली आहे.
एका मॉडिफाइड थार जीपचे 23 हजाराचे चालान कापले. पण आम्ही गाडीचा रेकॉर्ड पाहिला तेव्हा ती गाडी थार नसून 19 वर्षे जुनी एक बोलेरो असल्याचे आमच्या लक्षात आल्याची माहिती वाहतूक डिएसपी सुशील प्रकाश यांनी दिली. अपघातानंतर विकलेली ही गाडी मॉडिफाइड करण्यात आली होती. एजन्सीकडून आलेल्या वाहतूक नियमांच्या अधिन राहून बनवल्या जातात. पण मॉडिफिकेशन करणे वाहतूक नियमांच्या विरोधात आहे, असेही ते पुढे म्हणाले.