२२ दिवसांच्या बाळाच्या पोटात १८ दिवस 'सुई'... सुदैवानं जीव वाचला

इतक्या त्रासातून हे बाळ जात असताना पालकांनाही त्याला नेमका काय आणि का त्रास होतोय, हे लक्षात येत नव्हतं, पण...

& शुभांगी पालवे | Updated: Jul 20, 2018, 12:36 PM IST
२२ दिवसांच्या बाळाच्या पोटात १८ दिवस 'सुई'... सुदैवानं जीव वाचला  title=

मुंबई : तुम्ही आपल्या चिमुरड्यांना एखाद्या क्लिनिकमध्ये घेऊन जात असाल तर उपचार सुरू त्याकडे असताना जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं बनलंय... असं आम्ही म्हणतोय त्याला कारणही तसंच आहे... मुंबईत एका अवघ्या २२ दिवसांच्या बाळाच्या शरीरातून एक सुई बाहेर काढण्यात आलीय... लसीकरणानंतर तब्बल १८ दिवस ही २ सेंटीमीटरची सुई या बाळाच्या पोटात होती, हे विशेष... इतक्या त्रासातून हे बाळ जात असताना पालकांनाही त्याला नेमका काय आणि का त्रास होतोय, हे लक्षात येत नव्हतं... परंतु, वाडिया हॉस्पीटलच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे या बाळाचे प्राण वाचलेत.


एक्स रे

डॉक्टरांनाही बसला धक्का

चेंबुरला राहणाऱ्या आस्था सुधाकर पास्ते या आपल्या ३ दिवसांच्या बाळाचं पनवेल स्थित एका नर्सिंग होममध्ये लसीकरण केलं होतं. तब्बल १९ दिवसांनंतर तापानं फणफणणाऱ्या बाळाच्या शरीराच्या उजव्या बाजुला सूज आलेली आहे असं लक्षात आल्यानंतर पालकांनी त्याला जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला. एक्स रे आणि अल्ट्रासाऊंडमध्ये बाळाच्या हाडांना आलेली सूज स्पष्ट दिसत होती... त्यामुळे, डॉक्टरांनी बाळाला परेलच्या 'बाई जेरबाई वाडिया' रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. वाडिया रुग्णालयात उपचार सुरू झाल्यानंतर एक्स रेमध्ये बाळाच्या हाडांना सूज येण्यासाठी बाळाच्या शरीरात असलेली एखादी 'वस्तू' कारणीभूत असल्याचं अनुभवी डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यानंतर सीटी स्कॅनमध्ये ही बाहेरील वस्तू म्हणजे एक २ सेंटीमीटरची सुई असल्याचं समजल्यानंतर डॉक्टरांनाही धक्का बसला.

अखेर प्रयत्नांना यश

ही सुई बाळाच्या शरीरात कशी आली? याबद्दल आई-वडिलांनाही काही सांगता येईना... परंतु, बाळाच्या मागच्या बाजुला कंबरेच्या खालच्या भागात ही सुई अडकलेली होती... पालकांना याबद्दल डॉक्टरांनी विचारलं असता त्यांनी बाळाचं लसीकरण केल्याचं सांगितलं... तब्बल १९ दिवस ही सुई बाळाच्या शरीरात अडकली असल्याचं लक्षात येताच डॉक्टरांनी तात्काळ ती ऑपरेशनद्वारे शरीराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती वाडिया रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रज्ञा बेंद्रे यांनी म्हटलंय.

ही सुई शरीरात नेमकी कुठे आहे? आणि तिला बाहेर कसं काढता येऊ शकतं? हे शोधून काढण्यासाठीही डॉक्टरांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. यासाठी अनेक चाचण्याही करण्यात आल्या... आणि अखेर यशस्वीरित्या ही सुई बाळाच्या शरीरातून बाहेर काढण्यात आली. 

या घटनेनंतर, आपला त्रास व्यक्त न करता आल्यानं लहानग्यांवर उपचार करण्यासाठी उशीर होऊ शकतो... आणि हे बाळाच्या जीवावरही बेतू शकतं, त्यामुळे डॉक्टरांनीही उपचार सुरू असताना आपल्या लहानग्यांची काळजी घेण्याचं आवाहन पालकांना केलंय.