मुंबई : सीएए आणि एनआरसीच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. अनेक संघटनांकडून बंदला पाठिंबा देण्यात आला आहे.
मुंबईत असल्फा घाटकोपर इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. रिक्षा, बस, खासगी गाड्यांना वंचित बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न करत हे रास्ता रोको आंदोलन केलं. रमाबाई कॉलनीजवळ हायवेवर पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीच्या ५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. या रास्ता रोको आंदोलनामुळे हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली होती. चेंबुरमध्ये वंचित आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. वंचित कार्यकर्त्यांकडून बसच्या काचा फोडण्यात आल्या.
ठाण्यातही वंचित बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी CAA आणि NRC विरोधात बंद पुकारला. ठाण्यातील तीन हात नाका येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सध्या या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, सीएए आणि एनआरसीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंददरम्यान पुण्यात जनजीवन सुरळित सुरु आहे.
Maharashtra: Normal life continues in Pune amid statewide bandh called by Vanchit Bahujan Aghadi (VBA) today, in protest against #CitizenshipAmendemntAct and National Register of Citizens (NRC). pic.twitter.com/M6CwjpG4fo
— ANI (@ANI) January 24, 2020
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकत्व संशोधन कायदा आणि NRC विरोधात आज महाराष्ट्र बंद पुकारलाय. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र बंद असणार आहे. आंबेडकरांच्या या महाराष्ट्र बंदच्या निर्णयाला ३५ संघटनांनी पाठिंबा दर्शविलाय. CAA कायदा देशभरात लागू झाला आहे. या कायद्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आली. अनेक ठिकाणी आंदोलनांनी हिंसक वळण घेतलं. संविधान विरोधी काम करून केंद्र सरकार नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला होता. या बंदमध्ये कामगार संघटना, मुस्लीम संघटना सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येतयं.