मुंबई : ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी अरुण दाते यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रविवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या भावगीतांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायकाच्या निधनाने त्यांच्या चाहते भावूक झाले आहेत. अरूण दाते यांच्या गाण्याच्या चाहत्यांची संख्या जेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, तेवढी त्यांच्या चाहत्यांची देखील आहे. अरुण दाते यांची काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती. अरुण दाते सध्या मुलगा अतुल दाते यांच्यासोबत राहत होते. मुंबईतील कांजुरमार्गमधील निवासस्थानी रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अरुण दाते हे 1955 पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. वयाच्या पन्नाशीत त्यांनी भावगीतांवर लक्ष केंद्रीत केलं. भातुकलींच्या खेळांमधली, शुक्रतारा मंदवारा, शतदा प्रेम करावे, स्वरगंगेच्या काठावरती अशी अनेक गाणी अरुण दातेंनी त्यांच्या सूरांनी अजरामर केली. शुक्रतारा मंदवारा हे त्यांचं गाणं विशेष लोकप्रिय ठरलं.
अरूण दाते यांची शेकडो गाणी अजरामर आहेत, शुक्रतारा मंदवारा, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी. मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते हे त्रिकूट एकेकाळी प्रचंड गाजलं.
शुक्रतारा मंदवारा या गीताची ध्वनीमुद्रिका १९६२ साली प्रकाशित झाली. शुक्रतारा या नावाने मराठी भावगीत गायनाचे अडीच हजाराहून अधिक कार्यक्रम केले. अरुण दाते यांचा ४ मे रोजी वाढदिवस होता. यानिमित्ताने पुण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.