ठाणे : राज्यात आपल्या लावण्यांनी प्रसिद्ध असलेल्या विजया पालव यांच्यावर दिव्यात (ठाणे) जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. विजया राहत असलेल्या इमारतीचा केअर टेकर आणि कुंटूंबाने त्यांच्यावर हल्ला केल्याची तक्रार मुंब्रा पोलिसांना मिळाली आहे. परंतू पोलिसांकडे केअर टेकर चेतन पाटील आणि त्याच्या कुटूंबियांनी देखील पालव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दोन्ही कुटूंबांनी एकमेकांवर मारहाण झाल्याचा आरोप केला असून त्यांच्यात यापूर्वीही अनेकदा वाद झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजया पालव यांना पाटील यांच्या कुंटूबियांनी मारहाण केली. त्यामुळे त्यामुळे त्यांना कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
विजया पालव यांनी काही दुरूस्तीच्या कामानिमित्त प्लबंरला घरी बोलवले होते. चेतन पाटीलने प्लंबरला थांबवले आणि पालव यांना बाहेरच्या कारागिरांना काम न देण्याची धमकी दिली. त्याला विरोध केल्याने पाटील यांनी शिवीगाळ केली. दरम्यान, त्यांच्यात झटापटी होऊन विजया यांना मारहाण झाली. चेतन पाटील यांच्या कुंटूबियांनी देखील विजया यांना मारहाण केल्याचे पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याआधी देखील चेतन पाटील यांच्या गुंडागर्दी आणि मनमानी विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यात अनेक वाद झाले आहेत. यापूर्वी केअर टेकरने विजया यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
विजया पालव राहतात त्या इमारतीची देखभालीची जबाबदारी चेतन पाटील यांची आहे. परंतू इमारतीत बाहेरच्या कारगिरांना बोलवण्यावरून विजया आणि चेतन पाटील यांच्यात वाद झाला. तसेच दोन्ही कुटूंबियांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही कुटूंबियांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली असून, दोन्ही कुटूंबियांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.