सचिन वाझे, रियाज काझी पाठोपाठ विनायक शिंदे पोलीस दलातून बडतर्फ

विनायक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात कार्यरत होता.

Updated: May 24, 2021, 08:45 PM IST
सचिन वाझे, रियाज काझी पाठोपाठ विनायक शिंदे पोलीस दलातून बडतर्फ  title=

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी आणि लखन भैया बनावट चकमक प्रकरणात शिक्षा भोगत असलेला विनायक शिंदेला मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. सचिन वाझे, रियाज काझी पाठोपाठ विनायक शिंदे ही पोलीस दलातून बडतर्फ झाला आहे.

विनायक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात कार्यरत होता. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) विनायक शिंदे आणि बुकी नरेश धरे यांना अटक केली होती. विनायक शिंदे याने सचिन वाझे सोबत काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर एटीएसचा संशय अधिक बळावला होता. 

याआधी नोव्हेंबर 2006 मध्ये झालेल्या लखनभैया बनावट चकमक प्रकरणात देखील प्रदीप सुर्यवंशी याच्यासह विनायक शिंदेही दोषी आढळला होता. यानंतर विनायक शिंदेला सेवेतून निलंबित करण्यात आले. सचिन वाझे, सुर्यवंशी आणि विनायक शिंदे या तिघांनी एकत्र काम केले आहे. विनायक शिंदे मे 2020 पासून पॅरोलवर बाहेर होता.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करण्याच्या कटातही विनायक शिंदेचा सहभाग होता की याबाबत तपास होत आहे. 

5 मार्च रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह रेतीबंदर परिसरात आढळला होता. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला होता. या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला होता. विधानसभेत त्यांनी सचिन वाझे यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही दिवसातच सचिन वाझेला NIA अटक केली होती. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x