सर म्हणाले, नापास होशील... पण पास झालेल्या पठ्ठ्याची मिरवणूक सरांच्या दारात

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

सर म्हणाले, नापास होशील... पण पास झालेल्या पठ्ठ्याची मिरवणूक सरांच्या दारात

मुंबई : महाराष्ट्रात शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. यंदा दहावीचा निकाल चांगला लागला असून विद्यार्थ्यांना भरघोस यश मिळवलं आहे. कुणाच्या घरी आनंद होता तर कुणाच्या घरी अपयशाचं दुःखं. असं सगळं असत कांजुरमार्गमध्ये मात्र हटकेच उत्साह पाहायला मिळाला. कांजुरमार्ग पूर्व येथील मार्केटमध्ये दहावीच्या एका विद्यार्थ्याची चक्क मिरवणूक निघाली होती. तुम्ही म्हणाल, हा पठ्ठा शाळेतून पहिला आला की काय? मात्र कारण थोडं वेगळंच आहे. 

कांजुरमार्ग येथील एका खाजगी क्लासच्या सरांनी या विद्यार्थ्याबद्दल तू दहावीत नापासच होशील असा विश्वास दाखवला. पण या पठ्ठ्याने सरांचा विश्वास मोडीस काढत चक्क दहावीत 51% मिळवले. आणि मग काय... कांजुरमार्ग मार्केट परिसरातून या विद्यार्थ्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. आणि ही मिरवणूक थेट सरांच्या दारापर्यंत नेण्यात आली. सुरूवातीला परिसरातील लोकांना हा पठ्ठा दहावीत पहिला आला असा समज झाला होता. पण खरं कारण कळल्यावर त्यांना देखील मजा आली. 

या विद्यार्थ्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटीझन्सनी चांगला प्रतिसाद दिला आहे.