मुंबई : उद्या (बुधवार) सकाळपासून वाडियाची सेवा सुरळीत सुरू होणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली आहे. वाडियाचे पैसे लगेचच देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्य सरकारचे १६-१७ सालचे थकीत पन्नास टक्के २४ कोटी दोन दिवसात दिले जातील. महापालिकेने २२ कोटी देण्याचे मान्य केलं आहे. त्यामुळे उद्याच वाडियातली सेवा पूर्ववत होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
थकीत अनुदानावरून वाडिया रुग्णालय प्रशासन आणि मुंबई महापालिका आमनेसामने आले आहेत. मूळ प्रश्न बाजूला ठेवून दोन्हीकडून ऊणीदुणी काढली जात होती. पालिका प्रशासनानं तर थेट व्यक्तिगत पातळीवर येत वाडियाच्या सीईओंचं वेतनच जाहीर करून तिढा वाढला. यामुळे रुग्णालयाचे प्रश्न मात्र बाजूला पडले.
लहान बाळं आणि मातांना मुंबईमध्ये अत्यंत कमी खर्चात चांगले उपचार देणारं रुग्णालय अशी वाडियाची ओळख. मात्र महापालिका आणि राज्य सरकारनं २२९ कोटी रुपये अनुदान थकवल्याचं सांगत रुग्णांची भरती बंद करण्यात आली आहे. यावरून आता महापालिका आणि वाडिया ट्रस्टमध्ये जुंपली आहे.
शिवाय अनुदानाची रक्कम किती आहे, यावरूनही वाद आहेत. वाडिया व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार महापालिकेकडे १३५ कोटी आणि राज्य सरकारकडे ९४ कोटी थकित आहेत. स्थायी समिती अध्यक्षांनी २१ ते २२ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवलीये, तर सरकारनं केवळ २४ कोटी थकीत असल्याचा दावा केला आहे.