मुंबईकरांचे पाणी महागले, पाणीपट्टीत २.४८ टक्के वाढ

मुंबई महापालिकेने पाणीपट्टीत अडीच टक्क्यांनी वाढ केली आहे. येत्या १६ जूनपासून ही दरवाढ लागू होणार आहे.  

Updated: Jun 12, 2019, 08:11 PM IST
मुंबईकरांचे पाणी महागले, पाणीपट्टीत २.४८ टक्के वाढ  title=
संग्रहित छाया

कृष्णात पाटील / मुंबई : महापालिकेने पाणीपट्टीत अडीच टक्क्यांनी वाढ केली आहे. येत्या १६ जूनपासून ही दरवाढ लागू होणार आहे. पाणीपुरवठ्याचा खर्च वाढल्याचे सांगत पालिकेने घरगुती पाणीपट्टीत ९ पैशांनी तर व्यावसायिक पाणीपट्टीत ९५ पैशांची वाढ केली आहे. दर एक हजार लिटरमागे ही दरवाढ होणार आहे. २०१२ मध्ये महापालिकेत बहुमताने मंजूर झालेल्या ठरावानुसार प्रतिवर्षाप्रमाणे पाणीपट्टीत सुधारणा करण्यात आली असल्याचे सत्ताधारी शिवसेनेने स्पष्ट करण्यात आले आहे.

घरगुती, व्यावसायिक, उद्योग, हॉटेल अशा सर्व वापरकर्त्यांना ही दरवाढ लागू होणार आहे. मुंबईकरांना दररोज पालिकेकडून ३८०० दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. यासाठी महापालिकेला शेकडो कोटींचा खर्च करावा लागतो. पाणीपुरवठ्यासाठी २०१७-१८ मध्ये पालिकेला ८३६.६० टक्के खर्च आला होता तर २०१८-१९ मध्ये हा खर्च ८५७.३२ कोटी इतका खर्च आला आहे. म्हणजेच पाणीपुरवठ्यासाठी होणार्‍या खर्चात २.४८ टक्क्यांची वाढ झाली आहे. म्हणून ही दरवाढ करण्यात आली आहे. 

वाढणारा खर्च भागवण्यासाठी पालिकेत २०१२ मध्ये दरवर्षी किमान ८ टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. यानुसार यावर्षीदेखील पालिका प्रशासनाने ही पाणीपट्टी वाढवण्यात आली आहे. दरम्यान, एकीकडे पाणीकपात आणि पाणीटंचाई आहे. त्यामुळे आधी सुरळीत पाणी द्या आणि नंतर दरवाढ करा, अशी मागणी करीत विरोधकांनी पाणी दरवाढीवर आक्षेप घेतला आहे. तर पालिकेच्या नियमानुसारच ही दरवाढ झाल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.  
 

अशी झाली दरवाढ (प्रति एक हजार लिटर)

                             आधी              आता
घरगुती                    ०३.८२            ०३.९१
झोपडपट्टी                ४.२३              ०४.३३
बिगर व्यापारी          २०.४०           २०.९१
व्यावसायिक            ३८.२५           ३९.२०
उद्योगधंदे               ५०.९९          ५२.२५