मुंबईतील 'या' भागात चार दिवस होणार कमी दाबाने पाणीपुरवठा

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने पिसे पांजरापूर संकुलातील विद्युत उपकेंद्राच्या दुरस्तीचे काम हाती घेतल्याने मुंबईतील काही भागात पाणी कपात करण्यात येणार आहे. 

Updated: May 23, 2022, 02:06 PM IST
मुंबईतील 'या' भागात चार दिवस होणार कमी दाबाने पाणीपुरवठा  title=
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका 24 मे ते 27 मे या कालावधीत पाणी कपात करणार आहे. या कालवधीत मुंबईतील ए, बी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस आणि टी या 11 विभागातील काही परिसरामधील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. महानगरपालिकेने या दरम्यानच्या काळात नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. 
 
पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथे १०० किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्राच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. हे दुरुस्तीचे काम मंगळवार २४ मे ते शुक्रवार २७ मे या कालावधीत दररोज सकाळी ११.०० वाजल्यापासून दुपारी ३.०० वाजेपर्यंत एकूण ४ तासांकरिता करण्यात येणार आहे. यामुळे मंगळवार ते शुक्रवार सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण ४ तासांकरिता ५ टक्के पाणी कपात मुंबईत करण्यात येणार आहे. तर याच भागातील काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद होण्याची सुद्धा शक्यता महानगरपालिकेने वर्तवली आहे. 
 
या विभागात होणार पाणीपुरवठा कमी दाबाने 
दक्षिण मुंबईतील कुलाबा, कफ परेड, नरिमन पॉईंट, चर्चगेट, फोर्ट, क्रॉफर्ड मार्केट, भेंडी बाजार आणि कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, चेंबूर, टिळक नगर या पूर्व उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. 
 
या चार दिवसांच्या कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आली आहे.