वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार- अजित पवार

वरळीत आदित्य ठाकरे बिनविरोध निवडून यावेत, यासाठी संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा होती.

Updated: Sep 30, 2019, 10:48 PM IST
वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार- अजित पवार title=

मुंबई: आम्ही वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार रिंगणात उतरवणार, असे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. येत्या २ ऑक्टोबर रोजी आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. 

वरळीच्या जागेबाबत आम्हाला आघाडीतील मित्रपक्षांना विचारावे लागेल. काही घटकपक्षांनी वरळी मतदारसंघाची मागणी केल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. 

दोन दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. वरळीत आदित्य ठाकरे बिनविरोध निवडून यावेत, यासाठी संजय राऊत यांनी त्यांना गळ घातल्याची चर्चा होती. मात्र, आपण त्यासाठी शरद पवारांना भेटलो नव्हतो, असे संजय राऊत यांनी सोमवारी स्पष्ट केले. तसेच आदित्य ठाकरे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये जात असल्याच्या मुद्द्यावरी त्यांनी भाष्य केले. काही लोक तिकडून आमच्याकडे येत आहेत. काट्याने काटा काढावा, अशी एक म्हण मराठीत आहे. त्यामुळे थोडा काळ थांबा. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत निघून गेल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. आम्ही काट्याने काटा काढणार आहोत. सुरुवात त्यांनी केली, आता शेवट आम्ही करणार, असेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले. 

तत्पूर्वी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत आपण वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती ठरणार आहेत.मला तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचे आहे. तेव्हा सर्व शिवसैनिकांच्या परवानगीने आणि साक्षीने मी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करतो, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.