मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीसमोर हजर होण्याबाबत निवेदन दिलं आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईडी समोर जाणार आणि त्यांना सहकार्य करणार असल्याचं देशमुख यांनी म्हटलंय.
ईडीबाबतची याचिका सर्वोच न्यायालयाने स्वीकृत केली आहे. सर्वोच न्यायालय लवकरच यावर सुनावणी घेणार आहे. त्याचबरोबर न्यायालयाने खालच्या न्यायालयात जायची मुभा दिली असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ईडी समोर जाणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. राजकीय, सामाजिक जीवनात सदैव उच्च आदर्शाचे पालन केल्याचं देशमुखांनी म्हटलं आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आत्तापर्यंत ईडीने 5 वेळा समन्स बजावलं आहे. पण अनिल देशमुख एकदाही ईडीसमोर हजर झालेले नाहीत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांसंदर्भात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीने अनिल देखमुख आणि त्यांच्या कुटुंबाच्या 4.20 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.