आमदारांना फोडलं, पुढचं टार्गेट कोण? पाहा काय आहे एकनाथ शिंदे यांचा मास्टरप्लॅन

शिवसेनेचेही डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न, काऊंटर प्लॅनिंग सुरू 

Updated: Jun 24, 2022, 07:05 PM IST
आमदारांना फोडलं, पुढचं टार्गेट कोण? पाहा काय आहे एकनाथ शिंदे यांचा मास्टरप्लॅन  title=

Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे (Shivsena) दोन तृतियांश आमदार फोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदाला आणि नेतृत्वालाच जोरदार हादरा दिलाय. आता त्यांचं पुढचं टार्गेट आहे ते म्हणजे शिवसेना पक्षसंघटना ताब्यात घेण्याचं. केवळ विधिमंडळ पक्षात नव्हे, तर मूळ पक्षातही फूट पडल्याचं दाखवण्याचा बंडखोर शिंदे गटाचा पुढचा प्लॅन असणाराय.  

त्यादृष्टीनं राज्यातील विविध महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद सदस्यांना फोडण्याची तयारी एकनाथ शिंदेंनी चालवली आहे. 

400 नगरसेवक फोडण्याचा मास्टरप्लॅन? 
शिवसेनेच्या राज्यातल्या तब्बल 400 नगरसेवकांची यादी शिंदे गटानं तयार केलीय. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, वसई विरार, पनवेल उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक महापालिकेतले हे नगरसेवक आहेत. त्याशिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनाही फोडण्याचे प्रयत्न त्यापुढच्या टप्प्यात होऊ शकतात, असं समजतंय.

तर दुसरीकडं शिवसेनेनंही डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले आहेत. आमदारांच्या बंडाचं लोण नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत पोहोचू नये, यासाठी शिवसेनेनंही काऊंटर प्लॅनिंग सुरू केलंय.

शिवसेना कसं करणार 'डॅमेज कंट्रोल'? 
गुरुवारी मातोश्रीवर मुंबईतील विभागप्रमुखांची बैठक झाली. त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक शिवसेना भवनात पार पडली. मुंबई महापालिका नगरसेवकांची बैठकही बोलावण्यात आली. शिवसेना पक्षसंघटनेत फूट पडू नये, यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

लवकरच राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. शिवसेना आमदारांच्या बंडाचा फारसा विपरित परिणाम महापालिका निवडणुकांवर होऊ नये, यासाठी शिवसेना नेतृत्वानं खटाटोप सुरू केलाय. विधानसभेत ठेच लागल्यानं आता महापालिकेत तरी शिवसेना शहाणी होईल, अशी अपेक्षा आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x