मुंबई : एमआयएम (AIMIM) आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी काल औरंगाबादमध्ये (Aurangabad) खुलताबाद इथल्या औरंगजेबच्या कबरीवर जाऊन फूलं अर्पण केली. आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेब यांच्या कबरीला भेट दिल्यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. विरोधकांनी अकरुद्दीन ओवैसी यांच्यावर कारवाईची मागणी करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
कोणतीही कारवाई न करणाऱ्या ठाकरे सरकारवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे सरकारमध्ये हनुमान चालिसा म्हटली की कारवाई होते, पण काश्मिर तोडणाऱ्यांवर कारवाई होत नाही, शर्जिलवर कारवाई होत नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. उद्धव ठाकरे ज्या लोकांसोबत बसले आहेत, त्यांचीच निती ते चालवतायत असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.
औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन करुन तुम्ही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या देशभक्त मुसलमानांचा अपमान केला आहे. या देशात औरंगजेब हिंदुंचा तर नाहीच पण मुसलमानांचाही नेता होऊ शकत नाही.
कारण या देशावर त्याने आक्रमण केलं आहे. ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांना तडफडवून त्यांची निर्घृण हत्या केली. अशा औरंगजेबाचं महिमा मंडन आम्ही मान्य करणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचं महिमा मंडन कोणी करत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
छोट्या छोट्या गोष्टींवर कारवाई करणारे, लीलावतीत एखादा फोटो ट्विट झाला तर त्याच्यावर कारवाई करणारे आता गप्प का आहे, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केलाआहे. सरकारने कारवाई केली नाही तरी आम्ही हे सहन करणार नाही. याची जागा त्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.