संजय राऊत यांनी का घातला निळा फेटा- उपरणं? मविआच्या मोर्चात त्यांचीच हवा

Sanjay Raut : महाविकास आघाडीतर्फे शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महा मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र त्याआधी माध्यमांसोबत बोलताना संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला

Updated: Dec 17, 2022, 10:50 AM IST
संजय राऊत यांनी का घातला निळा फेटा- उपरणं? मविआच्या मोर्चात त्यांचीच हवा title=

Sanjay Raut : भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जाणारा महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न या मुद्यांवरुन महाविकास आघाडीतर्फे महामोर्चा (Maha Morcha) काढण्यात येणार आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर समविचारी पक्षासह इतर संघटना या महामोर्चात सहभागी होणार आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. मोर्चाआधी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र यावेळी संजय राऊत यांच्या बदललेल्या लूकची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

महाविका आघाडीच्या महा मोर्चाआधी काही आंबेडकरी कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या. यावेळी संजय राऊत यांनी निळा फेटा आणि निळं उपरणं घातलं होतं. यानंतर त्यांनी मोर्चा संदर्भात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी संजय राऊत यांच्या नव्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधलं. पण संजय राऊत यांनी निळा फेटा आणि निळं उपरणं का घातलं याचीच चर्चा आता सध्या सुरुय. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाच्या वादानंतर संजय राऊत चर्चेत

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचे विधान संजय राऊत यांनी केले होते. यावरुन भाजपने संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत राऊत यांच्याविरोधात आज मुंबईत माफी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता राऊत यांनी घातलेला फेटा आणि उपरणं सध्या चर्चेत आलं आहे.

हे ही वाचा >> "अज्ञान पाजळायची संधी संजय राऊत यांनी सोडलेली नाही"

संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

भाजपने टीकेची झोड उठवल्यानंतर संजय राऊत यांनी आपल्या  वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं. "यात अपमान काय आहे? भाजपच्या काही लोकांचे मेंदू किड्या मुंग्यांचे आहेत असं मला वाटतंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे सुपूत्र नाहीत का? महाराष्ट्राचे सुपूत्र या नात्याने आम्ही ते आमचे आहेत असं म्हटलं. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म देशातच झालाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 1891 साली आताच्या मध्य प्रदेशात असलेल्या महू येथे झाला. पण तेव्हा मध्य प्रदेश नव्हतं. भाषिक राज्ये कधी निर्माण झाली याचा अभ्यास करावा. महाराष्ट्र, मध्य प्रदेश कधी निर्माण झाला त्यांना कळतं का? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला तेव्हा देशात कोणतंही राज्य नव्हतं. भाजपमध्ये बाहेरुन काय लायकीचे लोक घेतलेत ते कळतंय. महापुरुषांचा अपमान करतायत आणि आम्हाला अक्कल शिकवताय," असे संजय राऊत यांनी म्हटलं.

संजय राऊत यांच्या विधानानंतर आंबडेकरी संघटनांही आक्रमक झाल्या आहेत. काही आंबेडकरी महिलांनी शुक्रवारी सामना कार्यालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा शनिवारी सकाळी राऊत यांची काही आंबेडकरी कार्यकर्त्यांनी भेट घेतली.